✍️लेखिका – सरिता सातारडे, राह. नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विशेष लेख:- निखळ, निरामय सौंदर्याची स्वामिनी यशोधरेचे लग्न सिध्दार्थ गौतमाशी होते. मोरपिसासारखे हळूवार क्षण अलगदपणे पंख पसरून जातात आणि बाळ राहूलचेही आगमन होते. सर्व काही आलबेल सुरू असतांना रोहीणीच्या पाणी वाटपा वरून शाक्य आणि कोलीय यांच्यात संघर्ष सुरू होतो. शाक्यसभेतील वादविवादात युध्दाचा प्रस्ताव सिध्दार्थ नाकारतात आणि सुरू होते सिध्दार्थ आणि यशोधरेच्या जीवनातील चलबिचल.
गृहत्याग करण्याचा सिध्दार्थ निर्णय करतात आणि यशोधरेच्या महालात जातात. तिला पाहून ते स्तब्ध होतात काय बोलावे? कसे बोलावे? हे त्यांना सूचत नाही. यशोधराच स्तब्धता भंग करते आणि म्हणते, कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे. सिध्दार्थ म्हणतात, यशोधरा मला सांग, परिव्रज्जा घेण्याच्या माझ्या निश्चया बद्दल तुला काय वाटते? त्यांना वाटले की ती मुर्छित होऊन पडेल पण तसे काहीच झाले नाही. यशोधरा आपल्या संपूर्ण भावनांवर नियंत्रण ठेवून म्हणते “मी आपल्या जागी असते तर आणखी दुसरे काय करू शकले असते! कोलियांलिरूध्द यूध्द करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारीण झाले नसते. आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपणाला अनुमती आणि पाठिंबा ही आहे. मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रज्जा घेतली असती पण राहुल आणि तूमच्या माता पीत्याचे संगोपन करण्याची जिम्मेदारी माझी आहे. मात्यापित्या विषयी आणि आपल्या पुत्राविषयी आपण मुळीच काळजी करू नका. माझ्या शरीरात प्राण असे पर्यंत मी त्यांची देखभाल करीन.
ज्याअर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात त्या अर्थी आपण एक असा जीवनमार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल हीच एक केवळ माझी ईच्छा आहे.”
किती हा धिरोदात्तपणा!
किती ही उदात्तता!
याचा सिध्दार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यशील आणि उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचीती त्यांना आली. आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपला वियोग दैवाने कसा घडवून आणला याची सिध्दार्थांना कल्पना येते.
भावनांच्या महापुरात वाहवत न जाता समंजस पणातून सिध्दार्थाला परिव्रज्जा घेण्यास दिलेली सहर्ष सहमती. पती घर सोडून जातो म्हणून त्रागा करणे नाही.. सर्वसामान्य स्त्री सारखे आकांत तांडव करणे नाही.. की फक्त स्वतःची स्वार्थी वृत्ती नाही. स्त्री सुलभ तरल भावना यशोधरेला ही असतात तरीही सिध्दार्थाच्या निर्णयामागे ठामपणे ती उभी असते. कन्या, पत्नी, सून, माता या भूमिका यशोधरा प्रामाणिक पणे बजावते पण यातच आयुष्याची इतिकर्तव्यता आहे असे ती मानत नाही. सिध्दार्थाने गृहत्याग केल्यानंतर त्याच्या विरहात ही ती स्वतःला पूर्णपणे जाळून घेत नाही.
कवयित्री हिरा बनसोडे आपल्या ‘यशोधरा’ या कवितेतून म्हणतात,
“पण इतिहासाने सांगितली नाही
तुझ्या त्यागाची महान कथा.
सिध्दार्थाने समाधीचे ढोंग रचले असते तर
महाकाव्य चितारली असती तुझ्यावरही.
गाजली असतीस सीता-सावित्रीसारखी तू ही
पोथ्या – पुराणातून.
यशोधरे, धिक्कार वाटतो या अन्यायाचा.”
शेवटी कवयित्री म्हणते,
सिध्दार्थाच्या दोन्ही बंद पापण्यात, तूच आहेस येशू, तूच आहेस.
अशाप्रकारे कवयित्री यशोधरेचे ‘अप्रतिम विरही लावण्य’ दर्शविते.
संसारसुख त्यागून खडतड जीवनाचा अनुभव घेऊन नंतर सम्यक संबुध्द बनून कपिलवस्तूत तथागत येतात. ते आपल्या आईवडिलांना भेटतात. आप्तस्वकीयांना भेटतात. यशोधरा कुठे दिसत नाही म्हणून विचारणा केली असता, “खरोखर जर माझा काही मान ठेवायचा असेल तर सिध्दार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील” हे यशोधरेचे भाष्य तथागतांना कळते तेव्हा तथागत तिच्या स्त्रीसुलभ भावना समजून घेऊन आपले शिष्य सारिपुत्त आणि मोग्गलान यांच्या सोबत यशोधरेच्या दालनात जातात. तत्पूर्वी ते आपल्या शिष्यांना म्हणतात,” मी मुक्त आहे, परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही. बरीच वर्षे मला पाहिले नसल्याने ती अत्यंत दुःखी झाली आहे. तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील. पवित्र तथागतांना तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये” असे समजावून ते यशोधरेच्या दालनात जातात आणि बघतात यशोधरा विचारमग्न स्थितीत बसली आहे. भगवतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमविभोर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरूष सत्याची शिकवण देणारा जगतवंदणीय भगवान बुद्ध आहे हे विसरून ती त्यांचे पाय धरते आणि एकसारखी रडू लागते. खरं तर हा भावनावेग आहे. आंतरिक कल्लोळ आहे. दुसऱ्याच क्षणी यशोधरा शुध्दीवर येते आणि विनयाने बाजूला बसते. तिची विनयशीलता बघून राजा शुध्दोधन तथागतांना म्हणतात, हे तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामूळे असून ही काही क्षणिक भावनाविवशता नाही पतीविरहाच्या सात वर्षांच्या काळात सिध्दार्थने केशवपण केल्याचे तीने ऐकले तेव्हा तिनेही केशवपण केले. जेव्हा तीने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्ये व अलंकार याचा त्याग केला आहे तेव्हा तिनेही ते वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असे. हे केवळ तात्पुरत्या भावना विवशते मुळे नसुन ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय.
यशोधरेचे पावित्र्य, तिची उद्दात्तता, तिची सिध्दार्थांप्रती असलेली एकनिष्ठता हे सर्व गुण सिध्दार्थांना सम्यक संबुध्द बनविण्यास उपकारक ठरले आहे. ‘त्यांना माझ्या बद्दल सन्मान असेल तर ते मला भेटायला माझ्या महालात नक्कीच येतील. यशोधरेचा किती हा जाज्वल स्वाभिमान! सिध्दार्थ’ सम्यक संबुध्द ‘ जरी झाले असले तरीही यशोधरेचे अंतरंग समजून तीला भेटायला जातात. किती ही हृदयामधून निघून हृदयापर्यंत पोहचणारी अथांगता.
काही मूठभर कवी/लेखकांनी यशोधरेला सहानुभूती चा विषयच बनवून टाकलेला आपणास दृष्टीपत्थास येते. स्त्री ला बिचारी, अभागिनी अशा विशेषणांनी सजविण्यात त्यांना धन्यता वाटते. पण डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुध्द आणि त्याचा धम्म’ या धम्म ग्रंथात बाबासाहेब कणखरपणे यशोधरेचा स्वाभिमानी बाणा स्पष्टपणे सांगतात आणि धुसर असलेले चित्र आपल्या डोळ्यासमोर स्पष्टपणे आकाराला येते.
बुध्दांच्या भिक्खूंनी संघात यशोधरा प्रवेश करते. भद्दा कात्यायना बनून ४०/४५ वर्षे समाजाला जागृत करण्याचे महत् कार्य ती करते. वयाच्या ७८ व्या वर्षी ‘माझा उध्दार करण्यासाठी मी समर्थ आहे’ असे प्रत्यक्ष ती तथागताला सांगते. तथागताचे ‘अत्त दीप भव’ हे तत्वज्ञान प्रत्यक्ष आचरणात आणणारी यशोधरा अशाप्रकारे अनेकांची प्रेरणास्थान आहे. तीचे धिरोदात्त व्यक्तीमत्व खरोखरच आपणास आपले काटेरी जीवन फुलविण्यात मार्गदीपक असेच आहे.
राजकन्या गोपा ते सिध्दार्थाची पत्नी यशोधरा आणि नंतरची भद्दा कात्यायना (थेरी रूप). यशोधरेची ही विविध रूपे खरोखरच थक्क करणारी आहेत.
ज्यांना बुध्दप्रणित शाश्वत सुखाच्या मार्गाचे अनुसरण करावयाचे आहे, त्यांच्या करिता शीलपालन ही पूर्व अट आहे आणि म्हणूनच यशोधरेच्या जीवनात नैतिकतेचे अधिष्ठान आहे.
बुध्द कालीन स्त्री चे जीवन तेव्हा इतके सन्मानपूर्वक होते. डोळसपणाने माणूसकीचे तत्वज्ञान स्विकारण्याचे स्वभान तेव्हा बुध्द कालीन समाजात निर्माण झाले होते.
नैतिकता आणि शीलाचरण हा स्त्री आणि पुरुष दोघांच्याही जीवनमूल्यांचा अविभाज्य घटक होता.
स्त्री भोगदासी नाही, वासनेची गुलाम नाही किंवा पापयोनीही नाही तर ती पुरुषा प्रमाणेच अधिकारिणी, विनयिनी, ज्ञानवर्धिनी आणि नैतिकतेची स्वामिनी आहे ही जनभावना जागृत करणारा बौध्द समाज तेव्हा क्षितीजापलीकडील आभाळ पेलत होता.
आपली सांस्कृतिक माता यशोधरा ते आजचा आधुनिक स्त्री वर्ग यांचा एकंदर विचार केला तर यशोधरेकडून किती मोठा आदर्श आपण आपल्या जीवनात घेऊ शकतो. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि आयुष्यभरासाठी माता असते ती माता कशी असावी? याचा आदर्श आपण यशोधरेकडून शिकावा. नैतिकतेचे प्रशिक्षण यशोधरेकडून घ्यावे.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संवैधानिक हक्कामूळे यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या महिलांनी काल्पनिक बाजारबुनग्याच्या भिकेला न लागता आपल्या बुध्दी आणि विवेकाच्या जोरावर एक विज्ञाननिष्ठ समाज घडावा यासाठी स्वतः बदलावे. हे बदलने तिच्या कृतीतून दिसायला हवे. तिची कृती दिसली तर सूजान समाज या देशात घडण्यास कोणीही रोखू शकणार नाही.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348