सीमा सुरूशे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशीम:- जिल्हातून एक अनोख्या भष्ट्राचाराचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संपूर्ण वाशिम जिल्हात एकच खळबळ माजली आहे. रिसोड तालुक्यातील पेनबोरी ग्राम पंचायतमध्ये 2017 साली मयत झालेल्या मधुकर शांतीराम बोरकर यांच्या नावावर चक्क 2022-23 मध्ये पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 44 हजार 530 रुपयाचे ‘व्हाउचर’ काढण्यात आले आहे. ही माहिती समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली आहे.
मधुकर शांतीराम बोरकर हे 2017 साली मयत झाले. या नावाचे गावात दुसरे कोणतेही व्यक्ती राहत नाही. त्यामुळे या प्रकरणात पाणी कुठे मुरल आणि कुंपण कुणी खाल्ल असे प्रश्न निर्माण झाले आहे. मृतक व्यक्तीचा नावाने 44 हजार 530 पैसे कुणी काढले याचा शोध घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी तक्रार गावातील नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
मृतकाच्या टाळुवरच लोणी…
शासन आणि प्रशासन कितीही गतिमान आणि पारदर्शकतेचा कांगावा करीत असले तरी शासकीय कार्यालये भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. आता तर मृतकाच्या टाळुवरच लोणी खाण्यापर्यंत मजल गेली आहे. मधुकर शांतीराम बोरकर यांचे 3 फेब्रुवारी 2017 ला निधन झाले. परंतु मधुकर शांतीराम बोरकर त्यांच्या नावावर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 44 हजार 530 रुपयाचे व्हाउचर ग्राम स्वराजच्या संकेतस्थळावर त्यांचा मुलगा रवी मधुकर बोरकर यांना आढळून आला. त्यामुळे या भष्ट्राचार उघड झाला आहे. मधुकर शांतीराम बोरकर यांच्या मृत्यूची नोंद देखील ग्रामपंचायत मध्ये आहे. मग पैसे काढले कुणी असा प्रश्न उपस्थित होत असून मृताच्या नावावर देखील भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे.