सौ. हनिषा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मोबा. न. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विसापूर:- जिल्हा परिषद प्रशासनाने मागील शैक्षणिक सत्रात पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरून विसापूर जिल्हा परिषद हायस्कूल बंद करण्याचा फतवा काढला होता. त्यावेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाकऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून शाळा बंद न करण्यासाठी आंदोलन केले होते. चालू शैक्षणिक सत्रात विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत जोरदार प्रयत्न चालविले. यामध्ये गावाकऱ्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. विसापूर जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये आज घडीला वर्ग ५ ते वर्ग १० मध्ये ७० च्या आसपास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून पाचव्या वर्गात ३५ विद्यार्थी दाखल झाले आहे. विसापूरकरांच्या प्रयत्नामुळे जिल्हा परिषद हायस्कूलची पटसंख्या वाढली आहे.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये मागील शैक्षणिक सत्रात वर्ग ५ ते वर्ग १० दरम्यान केवळ २२ विद्यार्थी शैक्षणिक धडे गिरवीत होते. त्यामुळे अर्धे शैक्षणिक सत्र झाल्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने शाळेवर गंडातर आणले होते. याचा विरोध विसापूरकरांनी केला. सप्टेंबर २०२२ मध्ये जिल्हा परिषदेवर धडक दिली. जिल्हा परिषद हायस्कूल मधील पट संख्या वाढविण्याची संधी मागितली. तेव्हापासून ग्रामपंचायत मार्फत ज्यांचे पाल्य चौथ्या वर्गात होते. त्या पालकांची पालक सभा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती विभाग व टेकडी विभागात घेतली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पालकांचे समुपदेशन केले. जिल्हा परिषद हायस्कूल नेहमी सुरु राहिली पाहिजे. यासंदर्भात मार्गदर्शन केले. याला गावातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात सैनिक स्कूल मधील मयंक रविंद्र कांबळे याने वर्ग ६, बल्लारपूर जनता विद्यालयातील आर्यन मच्छिन्द्र कुळमेथे याने वर्ग ८, बल्लारपूर दिलासाग्राम कॉन्व्हेंट मधील वेदांत दिनकर डाहुले याने वर्ग ८, पटेल हायस्कूल, चंद्रपूर मधील सम्यक सुनील पुणेकर याने वर्ग ६ मध्ये प्रवेश घेऊन शिक्षकाचा आत्मविश्वास वाढविला. आता विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद हायस्कूलचे शिक्षण आवडत असल्याने पालक देखील आपल्या पाल्यांचा प्रवेश घेत आहे.
जिल्हा परिषद हायस्कूल, विसापूर मधील पट संख्या वाढविण्यासाठी सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, सुरज टोमटे, हर्षला टोंगे, वैशाली पुणेकर, गजानन पाटणकर, सुनील रोंगे, प्रदीप गेडाम, दिलदार जयकर, सुरेखा इटणकर, विद्या देवाळकर आदींचे प्रयत्न कारणीभूत ठरले आहे.
विसापूर जिल्हा परिषद हायस्कूल मधील विद्यार्थी पट संख्या मागील शैक्षणिक सत्रात फारच कमी होती. जिल्हा परिषद प्रशासनाने आम्हाला शाळेतील पट संख्या वाढविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आम्ही सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले. आजघडीला जिल्हा परिषद हायस्कूल मधील विद्यार्थी पट संख्या वर्ग ५ ते वर्ग १० पर्यंत ७० च्या आसपास आहे. आता जिल्हा परिषद शिक्षण विभागाने चांगले व उत्कृष्ट शिक्षण देणारे तीन ते चार शिक्षकांची तातडीने नियुक्ती करावी. असे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच ग्रामपंचायत विसापूर.