वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- जिल्हातील लोणावळा जवळ असलेल्या प्रसिद्ध कार्ला लेणी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्ताने सामुदायिक महा बुद्धवंदना चे आयोजन करण्यात आले होते. भगवान गौतम बुद्ध यांच्या २५८६ व्या बुद्ध जयंती निमित्त कार्ला बुद्ध लेणी मावळ येथे भिक्कू संघ सर्व धार्मिक संघटना, विविध सामाजिक संस्था सर्व लेणी संवर्धक यांच्या सहकार्याने हजारो बौद्ध बांधवांनी या सामुदायिक महा बुद्धवंदनात सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस बौद्ध भिक्खूंना त्रिशरण पंचशील देण्याची याचना केल्यानंतर पूज्य भंन्ते यांच्या संघाच्या वतीने महा बुद्ध वंदना घेण्यात आली व समता सैनिक दलाच्या वतीने कार्ला बुद्ध लेणीस मानवंदना देण्यात आली. धम्मदेसना झाल्यानंतर या महाबुद्ध वंदनेस उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले. यानंतर सर्वांनी मुख्य चैत्यगृहात जाऊन स्तूपास वंदन केले आणि या बुद्ध लेणी ची माहिती सांगितली.
अशा प्रकारे या वर्षी कार्ला बुद्ध लेणी या ठिकाणी झालेल्या महा’बुद्धवंदना या स्तुत्य उपक्रमामुळे संपूर्ण समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच प्रकारे पुढे देखील मोठ्या संख्येने दर वर्षी सर्व उपासक, लेणी संवर्धक, सामाजिक, राजकीय संघटना, पक्ष यांनी हा कार्यक्रम करण्याचा निर्धार केला आहे. या वर्षी प्रमाणे पुढील वर्षी गर्दी दुप्पट पटीने वाढेल असा दावा देखील केला जात आहे.

