वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- भारत हा जगातील एकमेव असा देश आहे जिथे सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत आणि याचमुळे भारताची विविधतेत ऐकता असलेला देश अशी असलेली ओळख अजून ठळक व्हावी आणि भारतात राहणाऱ्या विविध जातीधर्माच्या लोकांमध्ये एकमेकांबद्दल सद्भावना, प्रेमभाव निर्माण व्हावा या उद्देशाने तसेच रमजान ईद चे औचित्य साधून पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यान येथे विविध संस्था, संघटनांकडून शनिवारी पैगाम-ए-अमन या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रेम,शांती आणि सद्भावनेचा संदेश देणारी गाणी, कविता, शेर-ओर-शायरी अशा विविध कलाविष्काराच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमामध्ये ईद मुबारकचा सेल्फी पाॅईंट, आकर्षक रांगोळी, विद्युत रोषणाई आणि पताकांनी हा कार्यक्रम अधिकच उठावदार झाला.
प्यार बाटते चलो….. चल चलिए…… ही गाणी, मै खीर, तू शीरकूर्मा हा हिंदू- मुस्लिम संस्कृतीचा ऐक्य सांगणार्या रॅपचाही या कार्यक्रमात समावेश करण्यात आला होता. यावेळी बोलताना न्यायमूर्ती बी. जी. कोलते पाटील यांनी सांगितले की ‘आपल्या देशात कायमच मिली-जुली संस्कृती राहिली आहे. सध्याच्या परिस्थितीत आपण या व्देषाने भरलेल्या समाजात प्रेमाचे दुकान उघडण्याची जबाबदारी आपली आहे’ तर लोकायतच्या समन्वीका अलका जोशी कार्यक्रमाचा उद्देश सांगताना म्हणाल्या की, आपल्या संत परंपरेने समता, बंधूता, मानवता यांसारख्या मूल्यांची जपणूक करत तिचा प्रचार- प्रसार केला आहे, हीच मूल्ये आपल्या संविधानातही आली आहेत. म्हणूनच सर्व मिळून सर्व सण साजरे करणं ही आपली परंपरा राहिली आहे.

पुण्यातील लोकायत, मराठा सेवा संघ, भिम आर्मी (बहुजन एकता मिशन) मूलनिवासी मुस्लिम मंच, युनिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रवक्ते गोपाळ दाद तिवारी, माजी नगरसेवक अविनाश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन कदम, नितीन जाधव, मराठा सेवा संघाचे सचिव आडेकर, युनिक फाउंडेशनचे विशाल जाफरी यांनीही उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात पूणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षा मॄणालिनी वाणी, सिंह भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे दत्ता टोळ, मुस्लिम मंचचे अंजुम इनामदार, समाजकल्याण विभागाचे सुशीलकुमार शिंदे, अधिकारी म्हस्के, राष्ट्रवादी कॉंग्रेस अंगणवाडी कर्मचारी सभा, पथारी पंचायत, रिक्षा पंचायतीचे कार्यकर्तेही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पुणे पोलिस परिमंडळ १, डेक्कन पोलीस स्टेशन यांचें कार्यक्रमात विशेष सहाय्य लाभले, या कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी शिरकुर्माचा आस्वाद घेतला, या कार्यक्रमात शेवटी मराठा सेवा संघाचे सचिव सचिन आडेकर यांनी आभार प्रदर्शन मांडले.

