या योजनेत यंत्राच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्केपर्यंत अनुदान
✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा:- अलिकडे शेतीचा उत्पादन खर्च खुप वाढला आहे. त्यामुळे नफ्याची शेती करणे शेतकऱ्यांसाठी फारच कठीण झाले आहे. खर्च कमी करून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न शिल्लक रहावे यासाठी यांत्रिकीकरणावर भर दिला जात आहे. यासाठी कृषि विभागाच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात. अनेक शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घेऊन नफ्याच्या शेतीस प्रारंभ केला.
शेतकऱ्यांना शेती करतांना अधिक सोईचे, सुलभ व्हावे आणि यंत्रांचा वापर वाढवून खर्च कमी व्हावा यासाठी कृषि विभागामार्फत कृषि यांत्रिकीकरण प्रमुख तीन योजना राबविण्यात येत आहेत. त्यात राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण, कृषि यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण योजनेचा समावेश आहे.
कृषि यांत्रिकीकरणाच्या या तीन योजनांव्यतिरिक्त राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कडधान्य, गळीतधान्य व पौष्टिक तृणधान्य योजनेंतर्गत देखील कृषि औजारे दिली जातात. शेतकऱ्यांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे, दर्जेदार कृषि औजारे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देणे, कृषि उत्पादन प्रक्रियेत अद्यावत यंत्र सामुग्रीच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे, यासाठी या योजना राबविण्यात येत आहे.
या विविध योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना महाडिबीटी या पोर्टलवर नोंदणी करावी लागते. यासाठी आधार कार्ड, बँक पास बुक, बँक खाते व आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर, शेताचा सातबारा व ८ अ, यंत्र, कृषि औजाराचे कोटेशन जोडणे आवश्यक आहे. यांत्रिकीकरणा च्या या विविध योजनेतून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्र व औजारे, ट्रॅक्टर व पॉवर टिलर चलित यंत्र व औजारे, पिक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलीत औजारे, प्रक्रिया युनिट्स, औजारे बँक आदी अवजारे दिली जातात.
या योजनेतील विविध प्रकारच्या साहित्यासाठी अनुदान दिले जाते. ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती, महिला, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना किंमतीच्या 50 टक्के किंवा 1 लाख 25 हजार रुपये व इतर शेतकऱ्यास किंमतीच्या 40 टक्के किंवा एक लाख यापैकी जी कमी असेल तितकी रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. इतर यंत्र व कृषि अवजारांसाठी वेगवेगळ्या औजारासाठी त्या प्रमाणात अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती, महिला, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना किंमतीच्या 50 टक्के व इतर शेतकऱ्यास किंमतीच्या 40 टक्के रक्कम अनुदान म्हणून दिली जाते.