मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका कुरिअर बॉयला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडील तब्बल 27 किलो चांदी लंपास केल्याची धक्कादायक घटना सीबीएस परिसरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळच घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नाशिक येथील जय बजरंग कुरिअर अँड पार्सल सर्व्हिसेस कंपनीत कुरियर बॉय म्हणून काम करणारे अमितसिंग सिकरवार हे रविवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास फावडे लेनवरून चांदीचे पार्सल पुणे आणि औरंगाबादला पोहोचवण्यासाठी आपल्या दोन मित्रांसमवेत अॅक्टिव्हा गाडीवरून ठक्कर बाजार बस स्थानककडे निघाले होते. याचवेळी सीबीएस परिसरातील बाल सुधारलयासमोर त्यांची गाडी येताच एका मोटारसायकलवरून दोन आणि दुसऱ्या मोपेडवरून आलेल्या तिन दरोडेखोरांनी अमितसिंग यांची गाडी अडवली आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरोडेखोरांपैकी एकाने अमितसिंगच्या डोक्याला पिस्तुल लावताच अमितसिंगचे साथीदार घाबरून पळून गेले आणि काही वेळातच 27 किलो चांदीच्या पार्सलसह अॅक्टिव्हा गाडी असा एकूण 12 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाले.
याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात ही घटना घडल्याने पोलिसांच्या कारभारावरही संशय व्यक्त केला जातोय. चोरी गेलेल्या चांदीमध्ये नामांकित टकले बंधू सराफ नाशिक यांची 6,943 ग्रॅम, खुबानी ज्वेलर्स नाशिक यांची 5,123 ग्रॅम, बाफना ज्वेलर्स यांची 1,447 ग्रॅम तर 12,010 ग्रॅम हर्षित ज्वेलर्स चाळीसगाव यांच्या चांदीचा समावेश आहे.