✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- शहरातील घाटकोपर पोलीस स्टेशन येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून घाटकोपर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्याचा प्रयत्न केला. केल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.
सहाय्यक पोलीस निरीक्षकाने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णालयात उपचार साठी दाखल करण्यात आले. त्याचावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या दीड वर्षांपासून घाटकोपर पोलीस स्टेशन मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले बाळकृष्ण नानेकर यांची काही दिवसांपूर्वी पुणे येथे बदली झाली होती. त्यामुळे त्यांनी पुणे येथे कुटुंबियांसह राहण्याचा निर्णय घेतला. तशी तयारी त्यांनी केली होती. मात्र घाटकोपर पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना पुणे येथे जाण्याची परवानगी मिळत नव्हती. गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यात येत होता. त्यामुळे संतापलेल्या नानेकर यांनी सोमवारी रात्री पोलीस स्टेशन मध्ये असताना साफसफाई करण्याचे द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कर्तव्यावर असलेल्या इतर सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

