मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक :- प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि त्यावरील रासायनिक रंगांमुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होत असल्याने ते रोखण्यासाठी यंदा गणेशोत्सवात गणेशमूर्तींचे थेट नदीपात्रामध्ये विसर्जन करण्यास प्रतिबंध घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आणि पारंपरिक विसर्जन स्थळांची यादी मनपाकडून जाहीर करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत मनपा मुख्यालयात अधिकार्यांची बैठक झाली. गणेशोत्सवाबाबत शासनाच्या सूचनांची माहिती देण्यात आली. पीओपीच्या गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नाही. रासायनिक रंगांमुळे जलप्रदूषण होत असल्याने पाण्यातील जलचरांच्या जीवांना धोका निर्माण होतो. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन करण्यास प्रतिबंध घालण्यात येणार आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेच्या माध्यमातून कृत्रिम तलाव तसेच पारंपरिक विसर्जन स्थळांची यादी जाहीर केली जाणार आहे. या स्थळांच्या ठिकाणीच गणेशभक्तांनी प्रतीकात्मक विसर्जन करून मूर्ती मनपाच्या मूर्ती संकलन केंद्रांमध्ये दान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
यासाठी पोलिसांची मदत घेतली जाणार असून, बंदोबस्तासाठी पत्र पोलिस आयुक्तांना सादर केले जाणार आहे. याशिवाय मूर्ती संकलन केंद्रांकरिता सामाजिक, स्वयंसेवी संस्थांचीदेखील मदत घेतली जाणार आहे. या बैठकीसाठी शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, मनपाचे सर्व विभागीय अधिकारी तसेच घनकचरा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.