पुरोहित वर्गाच्या करामती – भाग
वेदांच्या उगमा संबंधी ब्राम्हणांनी इतके घोटाळे केले आहेत की तेच एकमेकांना अंतरविरोधी असतात. कोणाचा कोणाला ताळमेळ बसत नाही. पोट भरणे, दान, दक्षिणा, भोजनावळी यासाठी या लोकांनी इतरांना अक्षर शत्रु ठेवले. इतर कुणी वाचू नये अशी व्यवस्था करणे. ते वाचले तर ब्राम्हणांना लोक जाब विचारतील. चर्चा करतील आणि प्रश्न विचारतील का? असा प्रश्नच कुणी उपस्थित करता कामा नये? तसे केले तर ते देवाच्या विरोधी वर्तन म्हणजे पाप होईल. पाप झाले की नरकाच्या गाड्या ओठाला लागतील. या नरक याचनांचे चित्र उभे करुन वेदांना ऐकण्याची बंदी, लिहिण्या-वाचण्याची बंदी. पुढे मनुस्मृतीचे नियम फार कडक केले. स्त्री शुद्रांनी, अति शुद्रांनी वेदांचे श्रवण करु नये. तसे केल्यास कानात शिसे ओतावे. बोलला तर जीभ कापावी. म्हणून अगदी ब्राम्हण स्त्रीला सुद्धा वेद अध्ययन, अध्यापन, श्रवण, यांची बंदी होती. ब्राम्हण स्त्रीयांना संस्कृत येत नव्हते. त्या प्राकृत मध्ये बोलत. पुरुष संस्कृतमध्ये बोलत. इतकी भक्कम तटबंदी ज्या रक्षणासाठी ब्राम्हणांनी उभी केली होती.
त्यांनी वेदांच्या निर्मिती संदर्भात किती घोळ घातलेत ते आता आपण पाहू.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची पार लंगोटी फेडली आहे.
वेदांच्या उत्पत्ती संबंधी बाबासाहेब काय म्हणतात ते पाहू या.
वेदांच्या उत्पत्तीसंबंधी उपपत्ती ऋग्वेदात सांगितली आहे. प्रसिद्ध अशा पुरुषसुत्कात ती आहे. पुरुष; पुराण पुरुष एक दिव्य यज्ञ करतो आणि या यज्ञातुन ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद यांची निर्मिती होते. शतपथ ब्राम्हणातही विविध उपपत्ती आहेत. त्यातील एक अशी की, वेदांचा उगम प्रजापतीपासून झाला. प्रजापती हाच जगनिर्माता. त्यानं इच्छा केली. ‘अेकोहम् बरुस्याम,’ त्यानं खडतर तप केलं.
“पुरुष अशा प्रजापतीने इच्छा केली की, माझी वंशवृध्दी झाली पाहिजे. त्याने तप केले. भक्ती केली. मग त्याने प्रथम तीन वेदांच्या रुपानं ज्ञाननिर्मिती केली. ज्ञान हेच सर्व विश्वाच्या मुळाशी आहे. वेदांच्या अभ्यासाने मानवाला विशिष्ट बैठक प्राप्त होते. या ज्ञानाच्या आधारावर प्रजापतीने पुन्हा तप केले. त्यानं वाणीद्वारा जलाची निर्मिती केली. पृथ्वी जलमय झाली. प्रजापतीने तीन वैदिक शास्त्रासह जलप्रवेश केला. मग जीवकवच निर्माण झाले. जगाची निर्मिती झाली. ज्ञानी माणसाला अग्निमुख असे वेदात म्हणतात. कारण ज्ञान हे अग्नीचे मुख होय.”
“मन हे सागरासारखं आहे. या मनसागरातून वाणीद्वारा परमेश्वराने तीन वेदांची निर्मिती केली. मन हे सागर; वाणी हे तेजस्वी शस्त्र. त्याने त्रिवेदांना मनसागरातून बाहेर काढले.” वेदांचा उगम प्रजापतीपासून झाला; प्रजापतीने राजा सोम याची निर्मिती केली. आणि मग त्रिवेदांची निर्मिती झाली. “वाणी ही एक अविनाशी गोष्ट आहे. ती वेदमाता आहे; तो अमरत्वाचा केंद्रबिंदू आहे.” याशिवाय तैत्तिरीय उपनिशदांची आणखी एक उपपत्ती म्हणजे वेदांची निर्मिती प्रजापतीच्या हनुवटीतून – दाढीतून झाली. छांदोग्योपनिशदाने दिलेली उपपत्ती ही शतपथ ब्राम्हणाच्या उपपत्तीप्रमाणेच आहे. ऋग्वेद अग्नीपासून, यजुर्वेद वायूपासून, तर सामवेद सूर्यापासून झाला.
बृहदारण्यकोपनिशदात दोन उपपत्ती मांडल्या आहेत. त्यापैकी एक अशी ‘‘ओल्या लाकडाच्या अग्नीपासून धूर निर्माण होतो तसे परमेश्वराच्या श्वासोच्छवासातून ऋग्वेद, यजु, साम हे वेद निर्माण होतात तसे परमेश्वराच्या श्वासोच्छवासातून ऋग्वेद, यजु, साम हे वेद निर्माण झाले. एवढेच नव्हे तर अथर्ववेद, श्लोक, इतिहास, पुराणे, उपनिशदे, शास्त्रे ही सर्व त्यांच्याच श्वासोच्छ्वासाची निर्मिती आहे.’’ वाणी म्हणजे ऋग्वेद, मन, यजुर्वेद, आणि श्वास म्हणजे सामवेद.
वेदांची निर्मिती ब्राम्हापासून झाली. आणखी एका ठिकाणी वेदांची निर्मिती प्रजापतीपासून झाली असेही मनुस्मृतीत सांगितले आहे. विष्णुपुराणात असे सांगितले आहे की, ब्रम्हाच्या चतुर्मुखातून एकेका मुखातून एकेका वेदाची व आणखी इतर गोष्टींची निर्मिती झाली. पूर्वमुखातून ऋग्वेद, पश्चिममूखातून सामवेद, दक्षिणमुखातून यर्जुवेद आणि उत्तरमुखातून अर्थववेद! वेदांचा उगम चतुर्मुख ब्रम्ह्यापासून झाला तसे भागवतपुराण सांगते.
आतापर्यत आपण वेदांच्या उगमाबाबत निरनिराळया अकरा उपपत्तींचा विचार केला.
- वेदांचा उगम पुरूष यज्ञापासून. 2. स्कंभस्थित वेदांचा उगम. 3. परमेश्वराच्या मुखातून वेदांचा उगम. 4. इंद्रापासून वेदांचा उगम. 5. ‘काल’ हाच वेदांचा उगम. 6. अग्नि वायू, सूर्य यांपासून वेदनिर्मिती. 7. प्रजापती आणि जल यांपासून निर्मिती. 8. ब्रह्याचयज्ञ श्वासोच्छ्वासातून वेद निर्मिती. 9. मनसागरातून देवांची केलेली वेदांची निर्मिती. 10. वाणीपासून वेदांची निर्मिती. 11. ब्रम्हाच्या दाढीच्या केसापासून वेदांची निर्मिती.
‘वेदांचा उगम कसा’ या एका प्रश्नाची ही गोंधळात टाकणारी अनेक उत्तरे हाच एक कूटप्रश्न आहे. ही उत्तरें ज्यांनी ज्यांनी सजविली ते सर्व ब्राम्हण आहेत. ते सर्व एकाच वैदिक परंपरेतले आहेत. प्राचीन धर्मज्ञानाचे पुरस्कर्ते व पालक हे ब्राम्हणच होते. मग त्यांनी एका साध्या प्रश्नाच्या उत्तरासाठी एवढा वैचारिक गोंधळ निर्माण का करावा?
उपराकार लक्ष्मण माने