रविंद्र भदर्गे, परतुर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर दि.22 जून:- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात 20 व 21 जून रोजी गावो गावी जाऊन कृषी सहाय्यका मार्फत शिबिर घेण्यात आले या शिबिरात लाभार्थी शेतकऱ्यांनी सहभागी होऊन योजनेतील सध्या स्थिती तपासून त्रुटीची पूर्तता केली केंद्र शासनाने योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्याचे बँक खाते आधार संलग्न करणे ई केवायसी प्रमाणीकरण करणे या बाबी बंधनकारक केल्या आहेत. त्याशिवाय शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही असे आव्हान जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले होते.
मात्र याचबरोबर काही शेतकऱ्यांची भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे प्रलंबित असून मग त्या शेतकऱ्यांना सन्मान निधीचा चौदावा हप्ता मिळणार का असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांनी मागील काही हप्ते बँक खात्यामध्ये जमा न झाल्यामुळे महसूल विभागाकडे भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करण्याकरिता वेळोवेळी तहसील कार्यालयात खेटे मारले संबंधित विभागाला जमिनीचे दाखले सातबारा आठ अ ची नक्कल असे जमिनीचे दाखले दिले संबंधित विभागाने अद्यापही हे काम वेळेत पूर्ण केले नाही.
महसूल विभागाच्या अशा रेंगाळ कारभारामुळे परतुर तालुक्यातील शेतकरी पी एम किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहतील का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याच अनुषंगाने शेलवडा गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार श्रीमती. प्रतिभा गोरे यांना निवेदन अर्ज दिले. सदरील निवेदनावर शेतकरी राजेभाऊ नळगे, परमेश्वर नळगे, संभाजी कराळे, रामेश्वर बिल्हारे, लक्ष्मण नळगे, जिजा भाऊ कराळे, आसाराम नळगे आदींच्या सह्या आहेत.

