राज शिर्के मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मागील काही दिवसांपासून मान्सूनच्या पाऊसाची प्रतीक्षा आज संपली. गरमी मुळे मुंबईकराना दिलासा मिळाला असला तरी पहिल्या पाऊसात मुंबईच्या विकासाची पोलखोल झाल्याचे चित्र दिसून आले.
पहिल्या पावसामुळे मुंबईकर सुखावले असले तरी पण मुंबईत झाल्याचे पहिल्याच पावसाने मुंबई पाऊसासाठी किती सज्ज आहे हे दिसून आले. पहिल्याच पावसामुळे मुंबई अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. विशेष म्हणजे अंधेरीतील धक्कादायक दृश्य समोर आली आहे. अंधेरी सबवेत पाणी साचल्यामुळे मुंबईकरांची अक्षरश: तारांबळ उडाली. यावेळी एका महिलेला वाहून जाण्यापासून वाचवण्यात यश आले आहे. तसेच वाहनं वाहून जाऊ नयेत यासाठी ती रस्सीने बांधावी लागली. संबंधित प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. पहिल्याच पावसामुळे मुंबईत निर्माण झालेली ही परिस्थिती चिंताजनक आहे. अजून पूर्ण पावासाळा बाकी आहे.
पहिल्याच पावसात असं सगळं काही बघायला मिळत असल्याने मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे संबंधित घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला जातोय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नालेसफाईचा दौरा केला होता. पण अशाप्रकारे पाणी साचत असल्याने विरोधकांकडून नालेसफाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी संबंधित व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करत तक्रार केली आहे.’अंधेरी सबवे, एलबीएस मार्ग, साकीनाका ९० फिट रोड, माटुंगा, पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच महालक्ष्मी, दादर, माहीम, धारावी, परळ, शिव, किंग सर्कल, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, मुलुंड, दहिसर आदी ठिकाणच्या सखल भागांत पाणी साचलं आहे. परिणामी, नागरिकांची मोठी गैरसोय होत असून त्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण? उत्तर द्या’, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

