राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मुंबईत लाच खोरीचा भस्म्या रोग लागलेल्या महानगर पालिकेच्या एका अभियंत्याला बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिका प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. मुंबई महानगर पालिकेत कार्यरत एका अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडुन अटक केली आहे. मच्छिंद्र तांदळे असे 50 वर्षीय आरोपी अभियंत्यांचे नाव असून त्याला 2 लाख रुपये लाच स्वीकारताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
या प्रकरणात तक्रारदार हे हॉटेल चालक आहे. त्यांच्या हॉटेलचा पोटमाळा बेकायदेशीर असल्याची नोटीस प्रशासनमार्फत पाठवण्यात आली होती. तसेच पोटमाळ्यावर कारवाई करण्याचे नोटिसमध्ये सांगण्यात आले. 23 जून रोजी तोडक कारवाई न करण्याच्या बदल्यात आरोपी अभियंत्यांने हॉटेल मालक शिवानंद शेट्टी यांच्याकडे 3.50 लाख रुपये लाचेची मागणी केली.
शिवानंद शेट्टी यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे या बाबत तक्रार दाखल केली. आरोपी अभियांत्याशी तडजोड करून शेट्टी यांनी 2 लाखाचा व्यवहार ठरला. त्याप्रमाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत 26 जूनला सापळा रचला. आरोपी अभियंत्याला 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

