आशिष अबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो.8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जील्हातील कारंजा (घा.) येथील नगरपंचायतीत काँग्रेसची सत्ता आहे. पण याच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आता बंडखोरीचे सुरुंग लागले आहे. येथील नगरपंचायत मधील काँग्रेसच्या अध्यक्षांसह उपाध्यक्ष आणि कारंजा नगर पंचायतीतील काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी थेट शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने कारंजात राजकीय भूकंपच आला आहे.
या सर्वांनी काँग्रेसला राम राम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. कारंजा नगरपंचायतीत काँग्रेसचे नऊ तर भारतीय जनता पार्टीचे आठ नगरसेवक आहेत. बहुमताचा कौल काँग्रेसला मिळाल्याने नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता स्थापन झाली. तर नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तालुक्यात काँग्रेसला मोठे यश मिळाले. बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता आली. पण काही दिवसांपासून राजकीय घुसमट होत असल्याची चर्चा होत असतानाच आता काँग्रेसच्या अध्यक्षासह उपाध्यक्ष आणि कारंजा नगरपंचायतीतील काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे पूर्वी होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

