मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मुंबई, दि.27ऑगस्ट:- मुंबईच्या उपनगर असलेल्या वसईच्या नायगाव येथून एक खळबळ जनक बातमी समोर येत आहे. नायगाव पूर्व रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एका बॅगमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह दिसून आला.
नायगाव पूर्वच्या परेरा नगर ते नायगाव रेल्वे स्थानक रस्त्याच्या बाजूला खारफुटी झाडांमध्ये एक संशयित बॅग पडून असल्याची एका व्यक्तीला दिसली. त्या व्यक्तीने याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. माहितीच्या आधारावर पोलिस घटनास्थळी आले व त्या बॅगची तपासणी केली असता. त्या बॅगेमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. या मुलीच्या पोटावर धारधार शस्त्राने वार केल्याच्या खुणा स्पष्ट दिसून येत होत्या.
पोलिसांनी पंचनामा करून मुलीचा मृतदेह शविच्छेदना साठी रूग्णालयात पाठवून या प्रकरणी वालिव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. मृतदेहाच्या स्थितीवरून नुकतीच हत्या केल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला असून तिच्या शाळेच्या गणवेशावरून मुलीचे नाव निष्पन्न झाले आहे. सदर मुलीची अंधेरी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.