मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधि
नाशिक:- जिल्हातील इगतपुरी येथून एक भीषण अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. मुबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी नांदगावसदो फाट्यावर आज शनिवार (दि.27) पहाटेच्या सुमारास एका आयशरने कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत १ जण जागीच ठार झाला तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात आयशर मधील चालक व क्लीनर हे दोघेही अडकले होते. त्यांना दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यातील चालक जागीच ठार झाला होता तर गंभीर जखमी असलेल्या क्लीनरला पुढील उपचारासाठी टोलनाक्याच्या रुग्णवाहिकेने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अधिक माहिती अशी की, एम. एच २०, ए. एल. ३९७७ या क्रमांकाच्या आयशर वाहनाने एच. आर. ४६, इ. १७१६ या कंटेनरला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक संजीव कुमार, वय २२ वर्ष, रा. फिरोजाबाद, उत्तरप्रदेश हा जागीच ठार झाला आहे. तर क्लीनर गंभीर जखमी असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महामार्गावरील या परिसरात खड्डयांचे साम्राज्य पसरले असल्यानेच अपघात घडल्याचे बोलले जात आहे.