विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी:- अहमदनगर जिल्हातून एक खळबळ जनक घटना समोर आली आहे. गिरणी वरून दळण दळून आणते, असे सांगत घरातून बाहेर पडलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे (दि.23) ऑगस्ट रोजी घडली. 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आई-वडिलांसोबत राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात राहते. या मुलीचे आई, वडील मोल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. (दि.23) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी तांदुळवाडीत गिरणीवर दळण दळून आणते, असे सांगून घरातून गेली.
ती बराच वेळ झाला, तरी परत घरी आली नाही. त्यावेळी तिच्या नातेवाईकांनी गावासह परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळाली नाही. त्यानंतर आजूबाजूच्या गावांसह नातेवाईंकांकडे तिचा शोध घेतला, परंतु ती कोठेही मिळाली नाही. अखेर आई-वडिलाची खात्री झाली की, मुलीला कोणीतरी पळवून नेले आहे. त्यांनी राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. मुलीच्या आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो. नि. प्रताप दराडे करीत आहेत.