मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्यात प्रस्तावित असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहरातच व्हावे या मागणी करिता ४६ दिवसापासून अविरत ‘धरणे आंदोलन’ येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सुरू आहे.
हिंगणघाट शहरात आतापर्यंत कोणतीही उच्च व्यवसायिक शिक्षणाची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली नसून येथील आरोग्य यंत्रणा सुद्धा ढेपाळलेली असल्याचे अनेक आंदोलनकर्त्याचा आंदोलनातून वेळोवेळी दिसून आले. हिंगणघाट शहराची लोकसंख्या १.५० लाखाचा वर असून हिंगणघाट समुद्रपुर तालुक्याची संयुक्त लोकसंख्या साडेचार लाखाचा जवळपास आहे. त्यात तालुक्याला यवतमाळ,नागपूर, चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमा लागून असल्यामुळे ४५० गावाचा व्यापारी संबंध हिंगणघाट या विदर्भातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या हिंगणघाट शहराशी आहे.
उत्तर दक्षिण जाणारा सर्वात लांब प्रमुख रेल्वे मार्ग व राष्ट्रीय महामार्ग हिंगणघाट शहरामधूनच जातो. रहदारीच्या मार्गावरील प्रमुख स्थान आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाची असून येथे मातृ सुरक्षा वंदना योजने अंतर्गत मागील ३ वर्षापासून महिला रुग्णांची संख्या वर्धेतील रूग्णांपेक्षा अधिक आहे. अपघातप्रवण भाग ह्या तालुक्यात जास्त असल्यामुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अधिक आहे आणि गंभीर रुग्णांना सेवाग्राम व सावंगी येथील दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच मृत्यू गाठलेल्यांची संख्या अधिक आहे.
हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात १७.६४ एकर जागा उपलब्ध आहे. त्यामुळे कॉलेजसाठी नवीन जागा विकत घेण्याच्या खर्चाची बचत होऊ शकते. रुग्णांची संख्या अधिक आहे. लोकसंख्या भरपूर आहे, शहर रहदारीच्या मार्गावर आहे. इत्यादी बाबी पाहता हिंगणघाटला शासकीय महाविद्यालय झालेच पाहिजे. या मागणी बाबत शहरातील शिक्षक, विद्यार्थी, नागरिक व सामाजिक संस्था आग्रही आहे. त्याकरिता हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समिती व समितीचे सर्वपक्षीय नेते आपल्या कार्यकर्त्यासह ४६ दिवसापासून अविरतपणे धरणे आंदोलनात बसत असून त्यावर शासन आणि स्थानिक सत्ताधारी लोप्रतिनिधींनी अजूनही योग्य तोडगा काढलेला नाही.त्यामुळे त्यांचा संयम पाहू नये असे जनतेला वाटत आहे.
४६ दिवसापासून आंदोलनं सुरू असून शासनाने दखल न घेतल्याने हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार नागरिकांनी आणि समितीने केला आहे. शासनाने आता जनतेचा संयम पाहू नये अन्यथा अतिशय शांततामय व सनदशीर मार्गाने सुरू असलेले आंदोलन वेगळ्या तीव्र मार्गाने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेडिकल कॉलेजसाठी समाजसेवक श्याम इडापवार यांनी नुकतेच जाहीर भाषण देऊन हिंगणघाट येथील मेडिकल कॉलेजचा मुद्दा मार्गी लावला नाही तर भाजपाच्या किंवा महायुतीच्या कोणत्याही मंत्र्यांना हिंगणघाट समुद्रपुर सिंधी विधानसभा क्षेत्रात प्रचारसभा होऊ देणार नाही असे जाहीर आवाहन केले. तसेच त्यांनी यापूर्वी मुंबई येथे आझाद मैदानात उपोषण, हिंगणघाट येथे लोटांगण आंदोलन केले असून यापुढे अधिक धोकादायक आंदोलन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. करिता येथील लोकप्रतनिधींनी याची दखल घेऊन येत्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून हिंगणघाट मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा करण्यात बाध्य करावे आणि हिंगणघाटकरांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर पकडत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

