✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- मागील एक आठवडा पासून जिल्हात अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या मुसळधार पावसा मुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाणी साचून झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी पिकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानग्रस्त शेतपिकाची सूचना विमा कंपनीस द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपूर्ण जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतक-यांच्या शेतातील पिक खरडून गेले असण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या सोयाबीन पिक वाढीच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पिकाचे अवेळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान संभवते. या खरीप हंगामात आजपर्यंत 70 हजार 663 शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग नोंदविलेला आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत गारपिट, भुस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी अथवा विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते. यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत आपल्या विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाल्याबाबत आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या क्रॉप इन्शुरन ॲपवर, विमा कंपनीच्या 18001037712 या टोल फ्री क्रमांकावर किंवा विमा कंपनीच्या customersupportba@icicilobard.com या ईमेलवर किंवा विमा कंपनीच्या तालुका स्तरीय कार्यालय तसेच तालुका कृषि कार्यालय व ज्या बँकेत विमा जमा केला, त्या बँकेत पुर्वसूचना देणे आवश्यक आहे. सूचना दिल्यानंतर तात्काळ पंचनामे करता येईल व पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत विमा संरक्षण मिळविता येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

