मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधि
गडचिरोली:- महाराष्ट्रात नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या कारवाईत तीन जहाल इनामी नक्षलवाद्याना पकडण्यात मोठे यश पोलिसाना मिळाले आहे. भामरागड आणि एटापल्ली तालुक्यात नक्षल विरोधी शोध अभियान राबवताना तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. चकमक, जाळपोळ, हत्या आदींमध्ये सहभाग होता. अटक केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस ठाण्याच्या हद्दी कोयार जंगल परीसरात गोपनीय माहितीच्या आधारे शोध अभियान राबविण्यात आले. गडचिरोली पोलिसांचे विशेष अभियान पथक (सी-60) व सीआरपीएफ बटालियन 37 चे जवान संयुक्त नक्षल विरोधी अभियान राबवित असताना दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. तसेच हेडरी पोलीस ठाण्यांतर्गत गट्टा -जांबिया हद्दीतील झारेवाडा जंगल परिसरात एका जहाल नक्षलवाद्यस अटक करण्यात यश मिळाले आहे.
कोयार जंगल परिसरामध्ये अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलवाद्यांमध्ये रमेश पल्लो वय 29 वर्षे रा. कोयार ता. भामरागड बक्षीस 4 लाख रुपये, तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी वय 23 वर्षे रा. पद्दुर ता. भामरागड जि. गडचिरोली बक्षीस 4 लाख रुपये तर मौजा झारेवाडा जंगल परीसरामध्ये अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे वय 27 वर्ष रा. झारेवाडा ता. एटापल्ली बक्षीस 2 लाख यांचा समावेश आहे.
गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे सन 2021-22 या दोन वर्षाच्या कालावधीत आतापर्यंत एकूण 57 जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे.