🖊️ महेन्द्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी🖊️
संगमनेर:- गणेशोत्सव काळात दोन-दोन डीजे वाजविण्यास संपूर्ण जिल्ह्यात परवानगी देण्यात येणार आहे, मात्र प्लाजमा व इकोला कुठल्याही प्रकारची परवानगी राहणार नाही, परंतु दोन अधिक दोनच्या मर्यादा ओलांडणार्या मंडळांवर व डीजे मालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी तंबी जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी दिली. संगमनेर येथे शांतता कमिटीच्या बैठकीत पाटील बोलत होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवन सभागृहात शांतता कमिटीची बैठक पार पडली. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, अपर पोलिस अधीक्षक ज्योती भोर, पोलिस उपअधीक्षक राहुल मदने, मुख्याधिकारी राहुल वाघ, गट विकास अधिकारी अनिल नागणे, शहर प्रभारी सपोनि सुजीत ठाकरे, तालुक्याचे प्रभारी सुनील पाटील यांच्यासह महावितरण, राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, गणेश विसर्जन मिरवणुकीसह गणेशोत्सव काळात ‘टू प्लस टू’च्या आवाज मर्यादेला परवानगी असली तरी आसपास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांची सामाजिक जाणीव प्रत्येक मंडळांनी ठेवावी, अशी ताकीद पाटील यांनी गणेश मंडळ पदाधिकार्यांना दिली.