विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अस्तगाव:- देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांना कोणतेही सण- उत्सव साजरे करणे दुर्मिळ असते. देशासाठी ते अहोरात्र झटत असतात. परकीय शत्रूपासून देशाचे व देशातील नागरिकांचे ते संरक्षण करून त्यांचे कर्तव्य ते प्रामाणिकपणे पार पाडत असतात. अशी देश सेवा करणाऱ्या देशप्रेमी सैनिकांना बहिणीच्या नात्याने रक्षाबंधनाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या अस्तगाव विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या पाठविल्या आहेत.
भारतीय संस्कृतीची जोपासना आणि या सैनिकां प्रती आपलेही असणारे उत्तरदायित्व ‘एक राखी सैनिकांसाठी या उपक्रमाच्या’ माध्यमातून त्यांनी जोपासले आहे. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद तोरणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सेवानिवृत्त मेजर रंजयकुमार सुलाखे यांच्या प्रेरणेने विद्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यालयातील वेगवेगळ्या वर्गातील सुमारे 175 विद्यार्थिनींनी कुशलतेने सुंदर अशा प्रकारच्या राख्या स्वयंस्फूर्तीने व स्वखर्चाने बनवल्या. त्या बनवलेल्या राख्या सैनिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मेजर संजय कुमार सुलाखे यांच्याकडे विद्यार्थीनी व उपस्थित शिक्षिका व प्र. मुखायध्यापक प्रमोद तोरणे, सखाराम शिंदे, चौधरी सर यांच्यातर्फे सुपूर्द केल्या. या विद्यार्थीनिंना विद्यालयातील उपशिक्षिका प्रतीक्षा थोरात, निर्मला लावरे, वृषाली बेल्हेकर, रोहिणी देव्हारे, छाया जेजुरकर यांनी मोलाचे सहकार्य केले. मुलींनी राबविलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

