सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर:- शासनाने मोठा गाजा वाजा करत रोजगार हमी योजना सुरू केली पण आज या मजुरांना मजुरी नाही मिळत असल्याने मोठ्या हाल होत असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील 26 हजार मजुरांची मागील तीन महिन्यांपासूनची सुमारे तीन कोटी 46 लक्ष रुपयांची मजुरी थकीत आहे. ऐन सण-उत्सवात मजुरी थकीत असल्याने मजुरांपुढे मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे.
सर्व नागरिकांना रोजगार मिळावा त्यातून त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडावी म्हणून महाराष्ट्रात रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. त्यानुसार ‘मागेल त्याला रोजगार’ उपलब्ध करून दिल्या जातो. या रोजगार हमी योजनेतून घरकुल, शौचालय, विहीर, खोदाई, गोठा बांधकाम या वैयक्तिक लाभाच्या कामासह सामूहिक शेततळे, मत्स्यतळे, शाळेसाठी संरक्षक भिंत, मैदानासाठी साखळी कुंपण, ग्रामपंचायत भवन, कॉंक्रीट नाला बांधकाम, शालेय स्वयंपाकघर आदी कामे जॉबकार्ड असलेल्या कामगारांमार्फत केली जातात. कामे केल्यानंतर हप्त्याभरात मजुरांच्या बँक खात्यात मजुरी जमा करण्याची तरतूद आहे. मात्र मागील तीन महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील 26 हजार मजुरांची तीन कोटी 46 लक्ष रुपये मजुरी शासनाकडे थकीत आहे. मजुरी मिळत नसल्याने महागाईच्या काळात त्यांना आर्थिक अडचणींचा सामना मजुरांना करावा लागत आहे.
रोजगार हमी योजनेच्या मजुरांनी महाराष्ट्र संदेश न्युजचा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, आम्ही रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरी करत आहोत पण तीन महिने झाले शासनाने मजुरी नाही दिली त्यामुळे आमच्यावर आता उपासमाळीची वेळ आली आहे. तरी शासनाने आम्हाला लवकरात लवकर मजुरी द्यावी.

