हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प राष्ट्रीय अभयारण्य महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध अभयारण्य आहे. या ताडोबा अभयारण्यात कोट्यवधीचा घोटाळा समोर आला आहे. त्यामुळे ऑनलाइन सफारी बुकिंग बंद करण्यात आली आहे. या भष्ट्राचाराच्या प्रकार समोर आल्याने ताडोबा व्यवस्थापनाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
ताडोबा अभयारण्य प्रशासनाने ऑनलाइन सफारी तिकीट बुकींगचे कंत्राट वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या एजन्सीला दिले होते. 2021 ते 2023 या वर्षाकरीता ते अंकेक्षण झाले असता त्यात 22 कोटी 80 लाख 67 हजार 749 रुपयांची तफावत आढळली. याबाबत एजन्सीला पैसे भरण्यास सांगितले असता त्यांनी 10 कोटी रुपये भरले. मात्र, उर्वरित रक्कम भरण्यास नकार दिला. त्यामुळे ताडोबा व्यवस्थापाने एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर व रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्यावर वनाधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरण न्यायालयात…
वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन एजन्सीने माय ताडोबा नावाचे संकेतस्थळ तयार करून ताडोबा सफारीसाठी सेवा पुरवीत होती. मात्र, 12 कोटींच्या घोळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने हे संकेतस्थळ बंद करण्याचा आदेश काढला. याविरुद्ध ठाकूर बंधूंनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने ताडोबा व्यवस्थापनाच्या आदेशाला स्थगिती देत हा निर्णय चंद्रपूर न्यायालयांतर्गत घेण्यात यावा, असे नमूद केले व जोपर्यंत निर्णय लागणार नाही तोपर्यंत ऑनलाइन बुकिंग बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

