संदिप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका गरिब कुटुंबियांच्या गरिबीचा फायदा उचलत नागपुर शहरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या परिवाराने या गरीब कुटुंबातील पालकांकडून त्याच्या 10 वर्षीय मुलीला खरेदी केली. त्यानंतर मुलीला घरकाम करणारी मोलकरीण बनवून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर संपूर्ण नागपुर जिल्हा हादरला आहे.
नराधम परिवाराने 10 वर्षीय पिढीत मुलीवर वारमवार अत्याचार केल्याने मुलीच्या मानसिकतेवर तर मोठा परिणाम झाला आहे. त्या मुलीच्या मनात खोलवर दहशत निर्माण झाली असून ती दिवसातून अनेकदा ‘हिना दीदी आ जाएंगी’ असे म्हणत आहे. यातूनच आरोपी कुटुंबाने तिच्यावर क्रौर्याची परिसीमा गाठत किती अत्याचार केला असेल पार हे लक्षात येते. दरम्यान, आरोपी अरमान इश्ताक अहमद खान वय 39 वर्ष याची शुक्रवारी चौकशी करण्यात आली व त्याची पत्नी हीना अरमान खान वय 26 वर्ष व मेहुणा अजहर यांच्या शोधासाठी तपास पथक बंगळुरूकडे रवाना झाले आहे. नागपुर शहरातील बेसा – पिपळा मार्गावरील अथर्व नगरी -3 मधील घर क्रमांक 11 येथे राहणाऱ्या आरोपींनी हा प्रकार केला.
आरोपी कुटुंब हे बंगळुरूमधील आहे. हे कुटुंब व्यवसायानिमित्त नागपूरात स्थायिक झाले. यावेळी आरोपीने बंगळुरूमधील गरीब परिस्थितीतील एका कुटुंबातील मुलीला त्यांनी दोन वर्षांअगोदर नागपुरात आणले. तिला शिक्षण देऊ, वाढवू असे म्हणत त्यांनी तिला आणले. प्रत्यक्षात ते तिच्याकडून घरकाम करवून घेऊ लागले. तिने काही चूक केली तर अगोदर ते तिला रागवायचे. मात्र, त्यानंतर त्यांनी क्रूरपणे वागायला सुरुवात केली व तिला मारहाण करायला लागले. तिघेही जण तिला लहानसहान चुकांवर तवा, सराटा किंवा सिगारेटचे चटके द्यायचे. अगदी तिच्या गुप्तांगाला चटके देण्यापर्यंत त्यांची मजल गेली.
हे नराधम आरोपी अरमान व अजहर इतक्यावरच नाही थांबले तर यांनी या मुलीवर लैंगिक अत्याचार देखील केले. सर्व आरोपी लहान मुलांसह 24 ऑगस्ट रोजी बंगळुरूला गेले व जाताना मुलीला घरातील एका कोंदट खोलीत कोंडून गेले. जाताना केवळ काही ब्रेडची पाकिटे ठेवली होती. मुलगी तहान-भुकेने व्याकूळ होऊन खोलीत बसली होती. अचानक दोन दिवसांअगोदर वीज विभागाचे कर्मचारी वीज कापण्यासाठी आले. अंधार झाल्याने भेदरलेल्या मुलीने हिंमत करून खिडकीतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणाची चौकशी करत असताना अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आरोपींनी तिला विकत आणल्याचे सांगत अनेकदा जिवे मारण्याची देखील धमकी दिली. तसेच, तिला अनेकदा जेवण देखील दिले जात नव्हते व तिला जमिनीवर झोपायला लावायचे.
या प्रकरणात आरोपी अरमान याला 10 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची पत्नी आणि मेहुण्यासाठी पोलिसांचे एक पथक बंगळुरूला रवाना झाले असून अधिक तपास पोलीस करत आहे.
लैंगिक शोषणाची शिकार झालेल्या दहा वर्षांची मुलीचे नागपुरात आल्यापासून नरकमय आयुष्य झाले होते. तिला अक्षरश: वेठबिगारासारखे वागविले जात होते. अगोदर आरोपी जाफरनगर येथे राहायचे व त्यानंतर अथर्वनगरीमध्ये राहायला आले होते. मुलीकडून घरातील सर्वच कामे करवून घेतली जात होती. तिला चटके देणे नेहमीचाच प्रकार झाला होता. मात्र, तिच्या गुप्तांगाला रोलिंग पिन व स्टीलच्या चमचाने इजा करण्यात येत होती. तिने काही वेळा शाळेत पाठविण्याबाबत म्हटले असता तुला आम्ही विकत घेतले आहे आणि तुझ्यासोबत वाट्टेल ते करू शकतो, असे उत्तर हिना द्यायची.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

