🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा:- आगामी काळात जिल्ह्यात विविध धर्मियांचे सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जाणार आहे. हे सण प्रेम, आदर, बंधूभाव वाढविण्यासोबत शांतता व सलोख्याने पार पडावेत यासाठी हिंगणघाट येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत शांतता समितीची सभा घेण्यात आली. त्यानंतर पोलिस विभागाच्यावतीने रुटमार्च काढण्यात आला.
उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीला पोलिस अधीक्षक नूरूल हसन, आमदार समीर कुणावार, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.मकेश्वर, तहसीलदार सतीश मासाळ, मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात आगामी काळात पोळा, गणेश उत्सव, ईद मिलाद, नवरात्री यासारखे विविध धर्मियांचे विविध सण साजरे केले जाणार आहे. या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस विभाग, नगर परिषद, हिंगणघाट तालुक्यातील सर्व गणेश मंडळ पदाधिकारी, पोळा समिती पदाधिकारी, विविध मुस्लीम संघटना व हिंदु संघटनांचे पदाधिकारी, पोलिस पाटील, पत्रकार, राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांसोबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
आगामी काळातील पोळा, ईद मिलाद रॅली, गणेश विसर्जन मिरवणूक आदी प्रसंगी जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे. हे सण उत्सव बंधुभाव वाढविणारे ठरावे, आपसात प्रेम आणि आदर या सणांच्या निमित्ताने निर्माण व्हावा, याबाबत बैठकीत उपस्थितांशी चर्चा करण्यात आली.
या बैठकीला हिंगणघाट, समुद्रपुर, वडनेर येथील नागरीक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सण उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता काय उपाययोजना करता येतील तसेच इतर काय अडीअडचणी आहेत याबाबत संबंधित मंडळे, समित्या, संघटनांसोबत चर्चा करण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केले तर आभार आभार तहसीलदार सतिश मासाळ यांनी मानले.
यावेळी शहरात काढण्यात आलेली रुट मार्चमध्ये जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांचा सहभाग होता. शांतता समितीच्या बैठकीनंतर पोलिस विभागाच्या वतीने शहरात रुट मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नूरूल हसन यांच्यासह सर्व अधिकारी सहभागी झाले होते. रुट मार्चद्वारे शहरातील मुख्य मार्गावर पाहणी करण्यात आली. विविध सणांच्या रॅलीच्या मार्गांचा दौरा करण्यात आला. यामध्ये पोलिस कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.