श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परळी:- मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झालेल्या परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील कृषी महाविद्यालय आणि संशोधन केंद्राच्या जागेची पाहणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी केली.केवळ घोषणा करून मुंडे थांबले नाहीत तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून तातडीने याबाबतचे आराखडे सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. परळी तालुक्यात तब्बल 314 कोटी रुपयांचे हे तीन प्रकल्प लवकरच सुरू होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दिनांक 16 सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कृषी विभागामार्फत परळी येथे कृषी महाविद्यालय व अन्य 2 शासकीय संस्था सुरू करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा केवळ घोषणापुरता मर्यादित न ठेवता कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ प्रक्रियेस सुरुवात केली असून मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयाप्रमाणे परळी तालुक्यात कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय तसेच सोयाबीन प्रक्रिया, संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या प्रत्यक्ष हालचालीना सुरुवात झाली आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात आज दुपारी एक वाजता परळी तालुक्यातील नियोजित जिरेवाडी परिसरातील शासकीय गायरान जागेमध्ये धनंजय मुंडे यांच्यासह वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच बीड जिल्हा कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि महसूल व अन्य संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित सदर जागेची पाहणी केली.