आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथे ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर 8 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नागपूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर हिंगणघाट येथील सगुणा कंपनी जवळ छोटी आर्वी शिवारात हा भीषण अपघात झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर खड्डा चुकवताना ट्रॅव्हल्स बस पलटली आहे. ही खाजगी बस हैदराबाद येथून रायपूरला जाण्याकरिता प्रवासी घेऊन निघाली होती. या बसला गुरुवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास अपघात झाला.
या खाजगी ट्रॅव्हल्समधून एकूण 28 प्रवासी प्रवास करत होते. पहाटेच्या सुमारास प्रवाशी साखर झोपेत असतानाचा हा भीषण अपघात झाला. यात एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 8 प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्वांना हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.

