मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
अहेरी:- नगरपंचायत क्षेत्रांतर्गत येत असलेल्या लेआऊटस मध्ये रस्ते, पाणीपुरवठा, तसेच वीज व इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी लेआऊट पाडणाऱ्या संबधित कंत्राटदारांची असते. मात्र अहेरी नगरपंचायत अंतर्गत टाकलेल्या लेआऊटस मध्ये अनेक त्रुटी तसेच सोयीसुविधा उपलब्ध न करून देताच विकण्यात आले.
खाजगी लेआऊटस मध्ये नगरपंचायतीतर्फे कोट्यवधी रुपयांची निधी वापरून नियमबाह्यरित्या रस्ते, नाली बांधकाम व इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या संदर्भात माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत गोडशेलवर यांनी रीतसर तक्रार दाखल केली होती व तात्काळ संबधित गैरप्रकार व भ्रष्टाचाराचा चौकशी करीत आमरण उपोषणाला बसले होते. सदर उपोषणाची गंभीर दखल घेत अहेरी येथील उपविभागीय अधिकारी अंकित यांनी संबधित कंत्राटदारांना बोलावून येत्या २ महिन्यात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे सक्त निर्देश दिले आहे. तसेच सदर लेआऊटस मध्ये नियमबाह्य रित्या नगरपंचायतीने सोयीसुविधा उपलब्ध करून दिले होते. त्याची चौकशी सुरु झाली असून त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहे. आवीसच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून प्लॉट्स धारकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.