बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. या महिलेचा विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर धावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण बीड जिल्हात संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्याशी संबंधित लोकांनी रविवारी 15 ऑक्टोबर आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पिढीत महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास चालू आहे.
आरोपींनी महिलेचे कपडे फाडले. महिलेने विरोध केल्यावर आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर पीडित महिला कपड्यांशिवाय रस्त्यावर आरोपींच्या मागे धावली. तेव्हाचा हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. पीडिते नुसार भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नीला गुंडांच्या मदतीने आपली वडिलोपार्जित जमीन बळकावायची आहे. प्राजक्ता धस ज्या जमिनीवर दावा करत आहेत ती 60-70 वर्षांपासून त्यांच्या कुटुंबाकडे आहे, असा दावा पीडितेने केला आहे.
याप्रकरणी प्राजक्ता सुरेश धस, राहुल जगदाळे आणि रघु पवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम 354, 354 ब, 323, 504, 506, 354 अ, 34 आणि अनुसूचित जाती-जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
40 वर्षीय महिला पती आणि सुनेसह शेतात काम करत असताना त्याठिकाणी आलेल्या काही लोकांनी त्यांच्या शेतजमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की , रघु कैलास पवार आणि राहुल माणिक जगदाळे या दोघांनी पती आणि सुने समोरच मला विवस्त्र करून विनयभंग केला. प्राजक्ता सुरेश धस या त्याच ठिकाणी आडोश्याला उभे राहून ‘ घाबरू नका , तिला चांगला चोप द्या ‘ असे म्हणत होत्या. पती आणि सून माझ्या दिशेने येत असल्याचे पाहून दोघेही पळाले. त्यावेळी मी रघु पवार याला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे पळत होते, असे आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

