स्वतंत्र भारत पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर..
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.६:- हिंगणघाट समुद्रपूर विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी नुकत्याच काल दि.५ रोजी पार पडल्या.
आज दि.६ रोजी हाती आलेल्या निकालानुसार भाजपाच्या उमेदवारांनी समुद्रपूर तसेच हिंगणघाट तालुक्यातील पाचही ग्रामपंचायतीवरती सत्ता प्राप्त करीत बाजी मारली.
विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे जनसंपर्क कार्यालयात आज निवडणुक निकाला नंतर सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी आपली हजेरी लावली, आ. समिर कुणावार यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंचांचे स्वागत केले. आज दुपारी सर्व नवनिर्वाचीत सदस्यांनी मोठा जल्लोष करीत विजयाचा आनंद साजरा केला, यावेळी गुलाल उधळीत भाजप कार्यकर्ते व नवनिर्वाचित पदाधिकारी बँडबाजाच्या तालावर नाचू लागले, आमदार कुणावार हे सुद्धा या विजयी उत्सवात सहभागी झाले.
आज हाती आलेल्या निकालानुसार हिंगणघाट तालुक्यातील शेगाव (कुंड), धामणगाव, वालधूर गट ग्रामपंचायत, उमरी (येडे) येथे अनुक्रमे सौ दिपाली किशोर वंजारी, हेमंत पंढरीनाथ शिंदे तसेच प्रमोद दामोदर येडे इत्यादी भाजप उमेदवारांनी सरपंचपदाची निवडणुक जिंकली तर समुद्रपूर तालुक्यातील दहेगाव (उजवणे) तसेच देरडा ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपाचे अंकुश विठ्ठलराव खुरपडे तसेच पियुष अशोकराव भुसारी हे निवडून आले.
हिंगणघाट तालुक्यातील शेगाव (कुंड) ही मोठी ग्रामपंचायत असून येथे अनेक वर्षापासून स्वतंत्र भारत पक्षाची एकहाती सत्ता होती. स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे यांचे कार्यक्षेत्र असून त्यांनी स्वतःसुद्धा या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उमेदवारी केली होती, परंतु येथील मतदारांनी मधुसूदन हरणे यांचेसह हरणे समर्थीत उमेदवारांना सपशेल नाकारले, तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा बॅकफूटवर आली असून येथे भाजपाने बहुमत प्राप्त केल्याचे दिसून येत आहे.
समुद्रपुर तालुक्यातील दहेगाव (उजवणे) तसेच देरडा ग्रामपंचायतीतही भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे, दहेगाव येथे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ७ पैकी ५ उमेदवार भाजपाचे आहे. देरडा येथील ग्रामपंचायतीत ७ पैकी ६ सदस्य भाजपाचे निवडून आले आहे.

