✒️विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी.- वाळू भरायला जाण्यास नकार दिल्याने बाळासाहेब गांगुर्डे या तरुणाला लाकडी फळीने मारहाण करून जखमी केले. ही घटना तालुक्यातील पाथरे खुर्द येथे घडली.
बाळासाहेब भाऊसाहेब गांगूर्डे वय 30, रा. पाथरे खुर्द, ता. राहुरी या तरुणाने राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजे दरम्यान बाळासाहेब गांगुर्डे हा तरुण पाथरे खुर्द गावामध्ये प्रवरा नदीच्या पुलाजवळ असताना तेथे काही जण आले व त्याला म्हणाले, तू आमच्या सोबत वाळू भरण्यास चल. बाळासाहेब गांगुर्डे याने त्यांच्या सोबत जाण्यास नकार दिला. याचा राग आल्याने त्याला लाकडी फळीने मारहाण करून जखमी केले. जिवे मारण्याची धमकी दिली. बाळासाहेब गांगुर्डे या तरुणावर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्याच्या फिर्यादीवरून अण्णा ऊर्फ अनिल भागवत औटी व सोमनाथ राजू घारकर दोघे (रा. पाथरे खुर्द, ता. राहुरी) या दोघांवर मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. वाळू तस्करांची तालुक्यात दहशत आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे व पो. ह. अशोक शिंदे करीत आहेत.