दशरथ गायकवाड पुणे प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. फुले ट्रस्टचे, ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय, सह्योगनगर , रुपीनगर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे येथे आज मंगळवार दिनांक ०६/०९/२०२२ रोजी शिक्षक दिन आयोजित केला होता याप्रसंगी इयत्ता १० वी च्या सर्व विद्यार्थ्यानी सकाळपासून दुपारपर्यंत इयत्ता १ ली ते ९ वी च्या वर्गावर शिक्षक होवून तास घेतले व शिक्षक होण्याचा अनुभव घेतला.
त्यानंतर आयोजित कार्यक्रमात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे खजिनदार श्री.बाळासाहेब सावंत हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. आकाश बाहेते उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमास ज्ञान प्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राहुल गवळी व ज्ञान प्रभात विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा सोनवणे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सर्व प्रथम प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. मनोगतातून त्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली शिक्षकांनी देखील या प्रसंगी आपापले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला व सर्व शिक्षकांच्या हस्ते इयत्ता १० वी मधील सर्व शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .त्यानंतर मुख्याध्यापिका प्रज्ञा सोनवणे यांनी सर्वांचे आभार मानले.