✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिकः- मारहाण करून दोघांचे अपहरण करीत त्यांच्याकडील रोकड व सोन्याचे दागिने लुटणार्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने छडा लावला आहे. पथकाने तपास करून तिघांना अटक केली असून, चौघांचा शोध सुरू आहे. या टोळीने 27 ऑगस्टला रात्री बाराच्या सुमारास आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकला होता.
दत्ता सारंग कुटे 28, रा. जेऊर, ता. मालेगाव, सध्या रा. बळीमंदिराजवळ, निरंजन ऊर्फ पप्पू घेवर शेळके 35, रा. धात्रक फाटा, आकाश राधाकिसन काळे 24, रा. कोळपेवाडी, जि. नगर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयपाल गिरासे व ओंकार राऊत हे दोघे दुचाकीवरून 27 ऑगस्टला जात असताना त्यांना एका टोळक्याने अडवून बेदम मारहाण केली. टोळक्याने दोघांनाही कारमध्ये टाकून अपहरण करीत त्यांना पुन्हा मारहाण केली व दोघांकडील रोकड आणि सोन्याची चेन बळजबरीने काढली होती. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात टोळक्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट एकही करीत होते. युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विष्णू उगले, सहायक उपनिरीक्षक रवींद्र बागूल, अंमलदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, शरद सोनवणे, संदीप भांड, नाझीम पठाण, विशाल देवरे, प्रशांत मरकड आदींच्या पथकाने संशयितांचा शोध सुरू केला. पथकाने तिघा संशयितांना साधुग्राम बसस्थानकासमोरून एमएच 15 डीसी 1776 क्रमांकाच्या कारसह ताब्यात घेतले. तिघांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी दरोड्याची कबुली दिली. त्यांच्यासोबत संशयित सोमनाथ कारभारी सानप, प्रशांत सखाराम आहेर, निलू ऊर्फ नीलेश कदम व आणखी एकाने दरोडा टाकल्याचे पोलिस तपासात समोर आले. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली एमएच 14 डीएफ 6891 क्रमांकाची कारही जप्त केली आहे.