🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा :- कारागृहातून सुटल्यावर पहिल्यांदाच घरी गेलेल्या व्यक्तीच्या घरावर चार युवकांनी सशस्त्र हल्ला करुन लाठ्या काठ्यांनी तसेच रॉडने युवकास मारहाण करीत जखमी केले. ही घटना ईतवारा परिसरात 5 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. शहर पोलिसांनी रात्री उशिरा यातील दोन आरोपींना अटक केली. तर दोघांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती दिली. राजू उर्फ बबलू भीमराव भगत वय 42 वर्ष असे जखमीचे नाव आहे. तर पोलिसांनी अटक केलेल्यांत सागर गेडाम रा. इतवारा आणि गुड्डू लोखंडे रा. रामनगर यांचा समावेश आहे. सागर घोडे रा. बोरगाव मेघे व अमोल गेडाम याचा शोध पोलीस घेत आहेत.
राजू उर्फ बबलू भगत याने सागर गेडाम याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणात राजू हा कारागृहात होता. चार महिन्यांपूर्वी राजू हा कारागृहातून सुटला होता. मात्र, जीवाच्या भितीमुळे तो घरी न परतता थेट मुंबई येथे वास्तव्य करीत होता. ५ रोजी तो मुंबईवरुन सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास त्याच्या ईतवारा येथील घरी परतला. तो त्याच्या कुटुंबासह घरी असताना रात्रीच्या सुमारास सागर गेडाम, गुड्डू लोखंडे, सागर घोडे, अमोल गेडाम हे हातात लाठ्याकाठ्या तसेच रॉड घेऊन राजूच्या घरात अनाधिकृतपणे शिरले.
सागर गेडाम याने कारागृहातून सुटून आला आता तुला जिवाने ठार मारतो, अशी धमकी देत रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. राजूच्या डोक्यावर मारहाण करीत त्यास जखमी केले. तसेच इतर तिन्ही आरोपींनी देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी तेथून पळ काढला. याप्रकरणी राजूने शहर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सागर गेडाम आणि गुड्डू लोखंडे या दोघांना रात्रीच अटक
केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी यांनी दिली.