युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- सरकारी वसतिगृहातील हजारो विद्यार्थी मागील तीन दिवसांपासून उपाशी असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीने या शासकीय वसतिगृहातील भोजन पुरवठादारांचे कंत्राट गेल्या 15 नोव्हेंबर रोजी संपले. त्यामुळे त्यांनी वसतिगृहातील मेस बंद केली आहे.
राज्य शासनाने सरकार मार्फत सुरू असलेल्या सर्व वसतिगृहात जेवणासाठी ब्रिक्स या कंपनीला नवे कंत्राट दिले आहे. परंतु नवीन कंपनीने या विद्यार्थ्यांच्या जेवणाची अद्यापही व्यवस्था केली नसल्याने शासकीय वसतिगृहातील हजारो विद्यार्थी गेल्या तीन दिवसांपासून उपाशी आहेत. दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे.
समाज कल्याण विभागा अंतर्गत राज्यात 434 शासकीय व 2783 अनुदानीत वसतीगृहात तब्बल 40 हजार विद्यार्थी शिकतात. या विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करणाऱ्यांचे कंत्राट तीन दिवसांपूर्वी म्हणजे 15 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आला आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील वसतीगृहातील खानावळी (मेस) बंद करण्यात आली आहे. खानावळी (मेस) बंद झाल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष परिणाम विद्यार्थ्यांवर झाला आहे. विद्यार्थ्यांना जेवणाचा प्रश्न उद्भवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वःखर्चाने २ वेळचे जेवण करावे लागत आहे. बरेच विद्यार्थी हे अत्यंत हलाखिच्या परिस्थितीतून वसतीगृहात प्रवेशित असल्याने ते जेवणाचा खर्च करण्यास असमर्थ ठरत आहेत.
मागील 3 दिवसांत त्यांनी कशीबशी आपली सोय केली पण मात्र आता त्यांना दोन वेळच्या जेवणासाठी भीक मागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थी शिक्षण घेतील की जेवणासाठी पायपीट करतील हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भोजन पुरवठादारासाठी नविन कंत्राट प्रक्रिया ही ऑक्टोबर महिन्यातच पूर्ण करण्यात आली होती. असे असून सुद्धा मुख्य भोजन पुरवठादाराने अद्यापही कोणत्याच उप भोजन पुरवठादाराची नेमणुक केली नसल्याने अक्षरशः विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.