उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील मलकापूर भागात रविवार, ३ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान वाढदिवसाचा केक कापण्यावरून वाद होऊन पाच जणांवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. यात पाच जण गंभीर जखमी झाले असून, जखमींना सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. एकाची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे. मलकापूर चौकात ३ डिसेंबर रोजी केक
कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या युवकांना काही नागरिकांनी थांबविले. यावरून दोन गटांत शाब्दिक बाचाबाची झाली. याचे रूपांतर हाणामारीसह प्राणघातक हल्ल्यात झाले. यानंतर यातील काही युवकांनी मलकापूर येथील नागरिकांवर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला चढविला. यात शुभम शांताराम वानखडे वय २८, अमित सुनील गोपनारायण वय २९, राजू प्रभाकर गोपनारायण वय ३६ आणि पवन मोहन गोपनारायण वय २७ हिरा कांबळे, सर्व रा. मलकापूर हे गंभीर जखमी झाले.
मलकापूरवासीयांचा निषेध मोर्चा: रविवारी मलकापूर भागात युवकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी परिसरातील युवकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. या प्रकरणातील आरोपींवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करून, त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी मोर्च्यातील युवकांनी निवेदनाद्वारे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच, शहर पोलिस उपअधीक्षक सुभाष दुधगावकर, खदानचे ठाणेदार धनंजय सायरे पथकासह तातडीने घटनास्थळावर पोहोचले दरम्यान गंभीर जखमी युवकांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.