देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- जिल्हातील डिगडोह नगरपरिषदेतंर्गत येणाऱ्या इंदिरामाता नगरात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारुविक्रेत्यांचा धुमाकूळ सुरु असून त्यांच्या त्रासाने अनेक कुटुंबे उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या दारुविक्रीवर लगाम घालण्यात यावा, या मागणीचे निवेदन डिगडोह जागृती मंडळाच्या वतीने राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांना देण्यात आले.
अवैध दारू विक्री बंदीसाठी रविभवन येथे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना डिगडोह जागृती मंचने निवेदनातून असे म्हटले आहे की, इंदिरामाता नगर या कामगारबहुल वस्तीत सद्या अवैध दारुविक्रेत्यांच्या मनमानीने येथील जनता त्रस्त आहे. सकाळपासून सुरु झालेली दारुवि्क्री रात्री उशिरापर्यंत सुरु राहात असून अनेकांचे संसार उघडे पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या बरोबर छोटेही या दारुविक्रेत्यांच्या चक्रव्युहात सापडले आहे. पोलिस विभागाला अनेकदा तक्रार करुनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे येथील त्रस्त नागरिकांची व्यथा ऐकून डिगडोह नागरिक जागृती मंडळाच्यावतीने हस्ताक्षर मोहिम सुरु करण्यात आली. शेकडो नागरिकांनी दारुविक्रेत्यांच्या विरोधात स्वाक्षऱ्या केल्या.
नागपुर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना उत्पादनशुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांना निवेदन देऊन दारुविक्रेत्यांवर अंकुश घालण्याची निवेदनातून मागणी करण्यात आली. या प्रकारात निश्चितपणे कडक कारवाई करण्याचे आश्वासन उत्पादन शुल्क मंत्री देसाई यांनी दिले. चर्चेअंती राज्य उत्पादन शुल्क मंत्री देसाई यांनी पोलिस अधीक्षकांना येथील दारुविक्री विरोधात सूचना केली. निवेदन सादर करताना डिगडोह जागृती मंचचे जितेंद्र मेश्राम, मोनू सिंह, मंगेश लोखंडे, सतीश कान्हेरकर, तानेश्वर चौधरी, विक्रम ईगोंले, अरविंद मेश्राम व समस्त सदस्य उपस्थित होते.