निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
मो नं.९०६७७६९९०६
घुग्गुस:- येथे झालेली भुस्खलनाची घटना अतिशय दुर्देवी आहे. अशा पध्दतीच्या घटना पुन्हा घडू नये यादृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्याचा कसोशिने प्रयत्न करण्यात येईल. या घटनेत स्थलांतरीत कुटूंबांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन प्रत्येकी १० हजार रूपये तसेच भाजपातर्फे प्रत्येकी ३ हजार रूपये अशी मदत प्राथमिक स्तरावर करण्यात आली असली तरीही आणखी काय मदत करता येईल ही बाब तपासून योग्य कार्यवाही करण्यात येईल असे प्रतिपादन वने व सांस्कृतीक कार्यमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आम्ही नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दिनांक ८ सप्टेंबर रोजी घुग्गस येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन मंजूर धनादेशाचे वितरण संबंधित कुटूंब प्रमुखांना करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, तहसीलदार निलेश गोंड, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी पंचायत समिती उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी ग्रा.पं. सदस्य सिनू इसारप, संतोष नुने, अमोल थेरे, शरद गेडाम, सुशील डांगे, विवेक तिवारी, विनोद चौधरी, हेमंत कुमार, धनराज पारखी, सुरेंद्र भोंगळे, विनोद जंजर्ला, चिन्नाजी नलबोगा आदींची उपस्थिती होती.
यावेळी श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील आमराई वॉर्डात 26 ऑगस्ट रोजी गजानन मडावी यांचे घर भुस्खलनामुळे जमिनीत 60 ते 70 फूट जमिनीत गेले. या घटनेची मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी तात्काळ दखल घेऊन प्रशासनाच्या अधिका-यांसोबत घटनास्थळाला भेट दिली. यावेळी गावक-यांसोबत चर्चा करतांना त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन गावक-यांना दिले होते. यासाठी स्वत: पुढाकार घेत मुंबईत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून 10 दिवसांच्या आत 16 लक्ष रुपयांचा निधी पिडीत कुटुंबासाठी मंजूर करून आणला. भुस्खलनाचा धोका असलेल्या 160 कुटुंबांना प्रशासनाने इतरत्र स्थलांतरीत केले आहे. मंजूर अर्थसहाय्यातून प्रत्येक कुटुंब प्रमुखाला 10 हजार रुपये याप्रमाणे 16 लक्ष रुपये तातडीने वाटण्यात आले आहे.