✒️युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ
नागपूर:- नागपूर जिल्ह्यात एका भष्ट्र महिला अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून. भिवापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी महिलेला मानधनाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यासाठी कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याकडून 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी त्यांना रंगेहाथ अटक केली. अनिता कृष्णराव तेलंग वय 55 वर्ष असे या लाचेचा भस्म्या रोग झालेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.
लाचखोर भष्ट्र गट विकास अधिकारी हिने स्वाती बंडू धनविजय वय 25 वर्ष, रा. चिखली, ता. भिवापूर या तरुणी कडून लाचेची मागणी केली. तिला या भष्ट्र महिला अधिकाऱ्याला लाच द्यायची नव्हती त्यानुळे स्वाती बंडू धनविजय या महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती.
स्वाती धनविजय ही भिवापूर पंचायत समितीच्या घरकुल विभागात कंत्राटी ग्रामीण गृह निर्माण अभियंता म्हणून मानधन तत्त्वावर कार्यरत आहे. लाभार्थ्याच्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून प्रतिघरकूल तिला 950 रुपये मानधन मिळते. अशा प्रकारे स्वाती धनविजय व अन्य एक कंत्राटी कर्मचारी अशा दोन्ही कर्मचाऱ्यांचे सहा महिन्यांचे तब्बल 1 लाख 1 हजार 403 रुपये मानधन थकीत आहे.
स्वाती मागील काही दिवसांपासून हे मानधन मिळण्यासाठी गटविकास अधिकारी अनिता तेलंग यांच्याकडे चकरा मारत होती. मात्र, मानधनाच्या देयकावर स्वाक्षरी करून ते मंजुरीसाठी सामान्य सेवा केंद्राकडे (सी. एस. सी.) पाठविण्याकरिता भिवापूर येथील गटविकास अधिकारी तेलंग या स्वातीकडे पैशांची मागणी करत होत्या. या त्रासाला कंटाळून स्वाती यांनी सोमवारी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने बुधवारी सापळा रचला आणि पंचायत समितीचे कार्यालय गाठत. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. तक्रारकर्ती स्वाती धनविजय ही भिवापूर गटविकास अधिकारी अनिता तेलंग यांच्या दालनात पोहोचली होती. तिच्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना तेलंग यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
तेलंग या वादग्रस्त अधिकारी –
मार्च 2022मध्ये भिवापूर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी अनिता तेलंग या रूजू झाल्या. तेव्हापासूनच त्यांच्या लाचखोर प्रवृत्तीमुळे पंचायत समितीचे वर्तुळ त्रस्त होते. यापूर्वी कुरखेडा येथे कार्यरत असताना तेलंग यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे. त्यामुळे तेलंग याची कुरखेडा येथून हकालपट्टी करण्यात आली होती. तसेच त्यांना भिवापूर येथे पाठविण्यात आले. आता याठिकाणी तेलंग यांनी सहा महिन्यातच येथील अधिकारी, कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना त्रासवून सोडले. त्यात त्यांना लाच घेताना अटक करण्यात आली.