✒️रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी
रत्नागिरी,दि.10 सप्टेंबर:- जिल्हातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या महिला नेत्या आणि माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सुकांत सावंत या मागील 10 दिवसांपासून बेपत्ता असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणात पोलिसांना घातपाताचा संशय असून त्यांनी त्या दृष्टीने तपासाला वेग दिला आहे. स्वप्नाली अचानक बेपत्ता झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. स्वप्नाली सावंत या शिवसेनेच्या मोठ्या महिला नेत्या आहे. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख असलेले सुकांत सावंत यांची देखील पोलिसांनी चौकशी केली मात्र अजून कोणताही उलगडा झालेला नाही. पती सुकांत सावंत यांनी दिलेल्या तक्रारी नंतर पोलिसांनी स्वप्नाली सावंत यांचा शोध सुरू केला आहे. दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता स्वप्नाली सावंत अचानक बेपत्ता झाल्या होत्या. सुकांत सावंत आणि त्यांच्या पत्नी स्वप्नाली सावंत यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक वाद निर्माण झाले आहेत. अनेकवेळा हा वाद चव्हाट्यावर देखील आला होता.
तसंच पोलीस स्थानकात वेगवेगळ्या तक्रारीवरून गुन्हे देखील दाखल झाले आहेत. परंतु, त्या बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे पती सुकांत सावंत यांनीच नोंदवली आहे, त्यामुळे रत्नागिरीत खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकारणमागे नेमके कारण काय आहे याचा पोलीस शोध घेत असून काही लपवले तर जात नाहीना अशी शंका पोलिसांना आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे.