वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरातील वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक खळबळजनक घटना समोर आली होती. एका बहिणीने आपल्या भावला पैसे दिले होते. दिलेले पैसे परत मागितल्याने भावाने आणि त्याच्या पत्नीने बहिणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहित बहिणीने विषारी औषध प्राशन केले होते त्यात उपचारादरम्यान बहिणीचा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला होता ही खळबळजनक घटना 6 डिसेंबर रोजी घडली होती याप्रकरणी 30 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावाने आणि त्याच्या पत्नीने बहिणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यात बहीण सुनीता उर्फ नीता रामेश्वर राठोड वय 31, रा. ताथवडे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. याप्रकरणी मृतक सुनीता यांच्या पतीने रामेश्वर राठोड यांनी वाकड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. त्यानुसार सुनीता यांचा भाऊ संदीप शामराव चव्हाण आणि त्याच्या पत्नी दोघे रा. ताथवडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी रामेश्वर आणि सुनीता यांना दोन मुले आहेत. दोघेही मजुरीचे काम करत होते. मृतक सुनीता यांनी आपल्या भाऊ संदीप याला दोन लाख रुपये उसने दिले होते. ते परत मागण्यासाठी 3 डिसेंबर रोजी त्या भावाच्या घरी गेल्या होत्या.
तिथे भावाच्या पत्नीने सुनीता शिवीगाळ करून घरातून हाकलून दिले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री उशिरा रामेश्वर यांच्या घरी येऊन संदीप याच्या पत्नीने सुनीता यांना मारहाण केली. 4 डिसेंबर रोजी याबाबत त्यांनी वाकड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.
5 डिसेंबर रोजी सुनीता एका सोसायटीमध्ये घर काम करण्यासाठी गेल्या होत्या. काम करून घरी परत येत असताना त्यांना भाऊ संदीप आणि त्याच्या पत्नीने अडवले. पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून दोघांनी सुनीता यांना बेदम मारहाण करून पैसे परत देणार नाही, काय करायचे ते कर अशी धमकी दिली. तसेच जीवे मारण्याची देखील धमकी दिली. याबाबत पुन्हा वाकड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
6 डिसेंबर रोजी सुनीता सकाळी सहा वाजता कामावर जाते असे सांगून घराबाहेर पडल्या. सकाळी दहा वाजता त्या ताथवडे येथे बेशुद्ध अवस्थेत त्यांच्या नातेवाईकांना दिसल्या. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना 10 डिसेंबर रोजी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.