✒️ राज शिर्के मुंबई पवई प्रतिनधी
मुंबई:- चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेच्या बंडखोर एकनाथ शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी “आम्ही शिवसेनेत होतो तेव्हा आदित्य ठाकरे गोधडीतही नव्हते,” असं म्हणत जोरदार टीका केली. त्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच “पान टपरीवाल्याला गोधडी दाखवतो,” असं प्रत्युत्तर दिलं. यावर आता भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते शुक्रवारी (९ सप्टेंबर) जळगावमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
गिरीश महाजन म्हणाले, “चंद्रकांत खैरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. गुलाबराव पाटीलही मंत्री आहेत आणि वरिष्ठ आहेत. चंद्रकांत खैरेंनी बोलताना तोल सांभाळला पाहिजे. वरिष्ठांना खुश करण्यासाठी आपण काय बोलावं याचा तारतम्य असायला हवं. आपला जुना सहकारी किंवा कुणीही इतर पक्षाचा असेल, त्यांच्याविषयी बोलताना संयम ठेवला पाहिजे.”