नितीन शिंदे, ठाणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- समाजातुन वेठबिगारी नष्ट करण्याचा संकल्प सर्वानी करूया, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले. महिलांसाठी प्रदीर्घ लढा देणाऱ्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी श्रमजीवी संघटनेच्या वतीने उसगाव, डोंगरी वसई येथे ४ हजार महिलांचा भव्य ‘आई सन्मान सोहळा’ बुधवारी पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन आ. केळकर यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते.
श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त,आई सन्मान सोहळ्याचे आयोजन वसई येथे करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन आ. संजय केळकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित, संस्थापिका विद्युलता पंडित, अध्यक्ष रामभाऊ वारणा, सरचिटणीस बाळाराम भोईर,विजय जाधव, गटविकास अधिकारी राजेंद्र खताळे आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हजारो महिलांच्या उपस्थितीत, ठाणे जिल्ह्यातील महिला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच सामाजिक कार्य करण्याऱ्या महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. हजारो महिला खेडेपाड्यातुन कार्यक्रमासाठी सकाळी लवकरच या सोहळ्याकरीता उपस्थित होत्या. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या नियोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित एकाही मान्यवराकडे मोबाईल फोन नव्हता, सर्वांचे फोन एका ठिकाणी जमा करून ठेवले होते.
श्रमजीवीचे संस्थापक विवेकभाऊ पंडित व विद्युलताताई पंडित यांच्या दूरदृष्टीची वाखाणणी आ. केळकर यांनी केली, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रमजीवी संघटनेच्या कार्याध्यक्षा स्नेहाताई दुबे पंडित यांनी केले.

