तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात थिरकली चिमुकल्यांची पाऊलं.
देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका, नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणा:- पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या संगम येथील शांग्रीला हायस्कूलच्या भव्य पटांगणावर तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी विविध चित्रपट गीते, लावण्या, कोळीगीत, माऊलीची पालखी , पोवाडा, शिवाजी महाराजांवर आधारीत ऐतिहासिक नृत्य, महिलांच्या विविध धार्मिक सणांवर आधारीत पारंपारिक नृत्य, शेतकरी व आदिवासी नृत्य गितांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकून घेतली. तसेच चिमुकल्यांच्या मोहक व दिलखेच अदांनी उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
तब्बल दोन दिवस चाललेल्या या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपीय – बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगणा पंचायत समितीच्या सभापती सुषमा कावळे – कडू या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य राजेंद्र उईके, सुनील बोनदाडे, अनुसया सोनवणे, गट विकास अधिकारी संदीप गोडशलवार, गट शिक्षणाधिकारी ज्योत्सना हरडे, बालविश्व् शिक्षण संस्थेचे सचिव नानासाहेब सातपुते, ब्रीज द गॅप फाऊंडेशनचे मुख्य व्यवस्थापक शिवराज विभुते, सेंटर हेड अनुराधा, विजय धनालकोटवर, शिक्षण विस्तार अधिकारी राजकुमार पचारे, प्राचार्या स्वाती दामले, केंद्र प्रमुख लीलाधर चरपे, केंद्र मुख्याध्यापक तुषार करपे हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.
या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात कबड्डी, खो-खो, लंगडी, त्रिटंगी दौड, धावणे, उंच व लांब उडी, प्रश्न मंजुषा, सामान्य ज्ञान, कुश्ती, बुद्धिबळ, वाद्य वादन, नृत्य, नकला, समूह गान, एकपात्री प्रयोग, वाद विवाद स्पर्धा या सारख्या स्पर्धेबरोबरच बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी विद्यार्थी, पालक व उपस्थित शिक्षकांनी या प्रसंगी अनुभवली.
हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दहा केंद्रातील विजेत्या शाळा या महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. या रोमहर्षक स्पर्धांमध्ये सर्वाधिक बक्षिसे पटकविण्याचा मान टाकळघाट केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुकळी बेलदार शाळेला मिळाला आहे. यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते विजयी स्पर्धकांना हिंगणा येथील ब्रीज द गॅप फाऊंडेशन तर्फे ट्रॉफी, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले.
या स्पर्धेचे जमानपद यशस्वीरित्या सांभाळलेल्या वानाडोंगरी केंद्राचे केंद्र प्रमुख लीलाधर चरपे यांच्या पुढाकाराने तालुकास्तरीय क्रीडा तथा सांस्कृतिक महोत्सव यशस्वीरित्या पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी राजकुमार पचारे यांनी सूत्रसंचलन मधुसूदन चरपे यांनी तर आभार केंद्र प्रमुख लीलाधर चरपे यांनी मानले.
क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव यशस्वितेसाठी केंद्र प्रमुख संघपाल शंभरकर, भुपेश चव्हाण, विजय क्रिपाल, एकनाथ ढोरे, ज्ञानेश्वर आपतुरकर, संध्या येळणे, माया शेंडे, गजानन लाड, रवी काटेखाये, स्वप्नील खोपे, धनंजय चन्ने, गजानन फुलकर, अवधेश तिवारी, सुनील अटेल, अनील तुराळे व विविध समित्यांची जबाबदारी सोपवलेल्या सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.