राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- देशात सर्वत्र राम मंदिर सोहळाच्या उत्साह बघायला मिळत आहे. बाबरीच्या ढाचाच काय? हिमालय हलवण्याची ताकद आमच्या सारख्या रामसेवका मध्ये आहे, असा सणसणीत पलटवार करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाण्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. तर प्रभु श्रीराम काय खातात म्हणणारेच शेण खात आहेत, असा हल्लाबोल करून जितेंद्र आव्हाडांवर नाव न घेता निशाणा साधला आहे. तसेच हिंमत असेल तर २२ जानेवारीला अयोध्येत येऊन दाखवा, असे आव्हानही देवेंद्र फडणवीसानी विरोधकांना दिले आहे.
आज ठाण्यात श्रीरामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या कारसेवकांचा सन्मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह राम मंदिर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करतानाच उद्धव ठाकरेंच राम मंदिरासाठी योगदान काय? असा सवाल केला. ज्यावेळी आमच्या सारखे असंख्य रामभक्त रामसेवक राम मंदिरासाठी लढा देत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे कुठल्यातरी जंगलात वाघांचे फोटो काढण्यात व्यस्त होते. कोठारी बंधुंसारखे खरे वाघ श्रीराम मंदिरासाठी बलिदान देत असताना आपण कुठे होतात? असा सवाल फडणविसांनी विचारला आहे.
ते पुढे म्हणाले की, ज्यांनी कोठारी बंधुंना शहीद केलं, ज्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला-मांडी लावून ते बसले आहेत. मंथरेचं ऐकलं तर काय होतं हे माहिती असतानाही उद्धव ठाकरें सोबत एक मंथरा आहे, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वाघ होते. मात्र ठाकरे गटामध्ये कोणीही वाघ नाही. एक नेता दाखवा ज्याने राम मंदिरासाठी काम केलं आहे. ढाचा पाडताना उपस्थित असलेला एक नेता मला दाखवा. मी देखील रामसेवक होतो, हे गर्वाने सांगतो. मी विसाव्या वर्षी रामसेवेला गेलो होतो. माझ्या वजनाने बाबरी पडली म्हणतात, बाबरी तर खूप छोटी गोष्ट आहे. हिमालय देखील हलवण्याची आमच्यात ताकद आहे. रामसेवकात ही ताकद आहे. राजकीय हिंदूंनी आम्हाला हिंदूत्व सांगायच नाही. आमच्या रक्तारक्तात हिंदूत्व आहे, असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.