विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जारावंडी हे गाव एटापल्ली तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड राज्याला लागून आहे. या अतिदुर्गम परिसरात अद्याप बँकेची सुविधा नाही. त्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी तब्बल 55 किलोमीटर अंतरावरील एटापल्ली तालुक्यात जावे लागते. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून येथे राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेची स्थापना कधी होणार, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.
जारावंडी परिसराचा लगतच्या आदिवासी भागातील 50 ते 60 गावांशी संपर्क जोडला आहे. म्हणजे जवळपास 15 ते 20 हजार लोकसंख्येने हा परिसर व्यापला आहे. परंतु, या परिसरात बँकेची सुविधा नसल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. बँक व्यवहाराबद्दल नागरिक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे नागरिकांना बँक व्यवहारासाठी 55 किलोमीटर अंतरावरील एटापल्ली तालुका गाठावा लागतो. आजकाल बॅंकेत खाते उघडण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असून प्रत्येक कामासाठी बॅंकेचे खाते अनिवार्य झाले आहे. प्रत्येक योजनेचा आर्थिक लाभ, प्रत्येक कामाचा मोबदला बँकेच्या खात्यावरच जमा केला जातो. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनेचे अर्थसाहाय्य राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या खात्यामध्ये जमा होते. महिला बचतगटाचा वाढलेला व्याप विस्तार, वृद्धांना मिळणारे निवृत्ती अर्थसाहाय्य, गरिबांना मिळणाऱ्या घराच्या बांधकामाच्या आर्थिक अर्थसाहाय्याचा लाभ, रोजगार हमी योजनेच्या कामाचा मोबदला, शेतकऱ्यांचे पीककर्ज, सोने तारण, इतर प्रकारचे कर्ज आणि विविध योजनेचे आर्थिक मदत आणि वैयक्तिक दैनंदिन आर्थिक व्यवहार, असे एकंदरीत सर्वच व्यवहार बँकेमधून होत आहेत. परंतु, जारावंडीत बँकच नसल्याने नागरिक या सर्व गोष्टीपासून वंचित आहेत.
जारावंडी परिसरात राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने नागरिकांना थेट 55 किमी गाठून एटापल्लीला जावे लागते. तिथेही रोजच गर्दी असते. याशिवाय नेटची चांगली सुविधा नसल्याने अनेकवेळा लिंक फेल होते. तिथे बसण्या, उठण्याची पुरेशी सुविधाही नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना चक्कर येऊन ते खाली पडण्याचे प्रकारही घडत आहेत. अशात पैसे भरण्या व काढण्यासाठी सुमारे 55 किमी अंतरावर गेलेल्या लोकांना काम न करताच परतावे लागते. म्हणून या सर्व बाबी जाणून जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ बॅंकेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
इंटरनेट पासून वंचित: एकीकडे शासनाच्या विविध योजना इंटरनेटच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत. परंतु नेटवर्क अभावी जारावंडी- कसनसुर परिसरातील गावांतील नागरिकांना विविध योजनाच्या माहितीपासून वंचित राहावे लागत आहे. जारावंडी कसनसुर, दिंडवी, भापळा, वडसाखुर्द सोहगाव घोळसुळ सेवारी गुडाम इत्यादी परिसरातील गावातील हजारो नागरिकांना इंटरनेट च्या सुविधे पासून वंचित राहावे लागत आहेत
जारावंडी परिसरात जवळपास 50 ते 60 गावांचा समावेश आहे त्या गावात नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. एखादा महत्त्वाचा फोन जर करायचा असेल, तर डोंगरमाथ्यावर जाऊन नेटवर्क शोधावे लागते आणि फोन करावा लागतो, तरीही नेटवर्कअभावी बरोबर बोलणे पण होत नाही. ही अवस्था फक्त जारावंडी परिसराचीच नसून संपूर्ण एटापल्ली तालुक्यातील बहुतेक गावांची आहे.
तरी मा जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्षदेऊन ही समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी अशी कळकळीची मागणी जारावंडी कसनसूर परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मला निराधार योजनेतून महिन्याकाठी आर्थिक सहाय्य मिळतो परिसरात बँक नसल्याने सरड तालुक्याला जावा लागतो आणि जाण्यासाठी एकच बस असल्याने अनेकदा काम न करताच परत यावा लागतो त्यामुळे मोठ्या अडचणी येत आहेत :नीलकंठ मोहूर्ले जेष्ठ नागरिक