✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- राज्यातील राजकारणात वारंवार नवनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. दोन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते यांच्यातील जवळीक गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना दिसत आहे. पण आता राज्यात वेगळंच समीकरण तयार होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. राज्यातील राजकारणात वारंवार नवनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. दोन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते यांच्यातील जवळीक गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना दिसत आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दुसरीकडे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मनसे-भाजप युतीला विरोध केला आहे. या घटनाक्रमानंतर मनसेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यासाठीच मनसेच्या गोटात हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मनसे नेते आणि सरचिटणीस यांच्यासोबत ठाकरे यांची बैठक होणार आहे. ही बैठक उद्या (12 सप्टेंबर) सकाळी दहा वाजता वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना या बैठकीबाबत उत्सुकता वाढली आहे. या बैठकीत राज ठाकरे नेमकी काय सूचना करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.