✒️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- नाशिकमध्ये 25 वर्षांचा शुभम चव्हाण हा तरुण मुलगा मित्रांसोबत धबधब्यावर गेला होता.
पण पाण्याचा प्रवाह अचानक वाढला आणि हा तरुण मुलगा वाहून गेला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे शुभमसोबत गेलेले त्याचे इतर 9 मित्रही प्रचंड धास्तावले आहेत. रविवारी दुपारी ही घटना घडली. त्यानंतर शुभमचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनही सुरु करण्यात आलं. पण अजूनही शुभमचा शोध लागलेला नाही. त्यामुळे चव्हाण कुटुंबीयांसह शुभमसोबत गेलेले त्याचे मित्रही कासावीस झालेत. अजूनही शुभमचा शोध सुरु आहे.
नेमकी कुठे घडली घटना?
त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील तोरंगण त्र्यंबकच्या पुढे हेदांबा नावाचा धबधबा आहे. या धबधब्यावर दहा मित्रा गेले होते. रविवारी धबधब्यावर अंघोळीचा आनंद लुटण्यासाठी जाणं तरुणांच्या अंगलट आलं आहे. हेदांबा परिसरातील धबधब्याचं पाणी अचानक वाढल्यामुळे दहा मित्रांपैकी एक मुलगा वाहून गेलाय. त्यामुळे इतर सर्वच मित्र धास्तावले आहेत. हे सर्वजण नाशिक रोड येथील जेलरोड परिसरात राहणार आहेत.
पावसामुळे पाणी पातळी वाढली
नाशिकमध्ये दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पावसाचं प्रमाण वाढल्यानंतर अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्याचा परिणाम धबधब्यातील पाण्याच्या प्रवाहावर देखील झाला. या पाण्याचा अंदाज न आल्यानं शुभम चव्हाण हा तरुण वाहून गेला. त्याचा शोधही घेण्यात आला. पण अजूनही तो कुठेच आढळून आलेला नाही. त्यामुळे भीती व्यक्त केली जाते आहे. नाशिकच्या भोसले मिलिटरी स्कूलची रेस्क्यू टीम, पोलीस दल मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक घटनास्थळी दाखल झाले. शुभमचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
शुभमच्या कुटुंबीयांनाही या घटनेनं मोठा धक्का बसला आहे. शुभम जिवंत सापडावा, अशी आशा वक्त केली जात आहे , याआधीही अनेकदा नाशिकमध्ये धबधब्याच्या पाण्यात बुडून वाहून जाऊन तरुणांनी जीव गमावला आहे. त्यामुळे वारंवार काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं. दरम्यान, तरिही तरुणांकडून धबधब्यावर पाण्यात उतरण्याचे प्रकार काही थांबत नसल्याचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालंय.