प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या भागात एक ट्रक रविवारी (ता. २८) दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास संशयास्पदरीत्या प्रवास करताना पोलिसांना दिसून आला. वर्धा पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केल्याचे ट्रकचालकाच्या लक्षात आल्यानंतर तो वेगाने ट्रक पळवू लागला. पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून ट्रकला थांबवण्याचे प्रयत्न केले. तीन ठिकाणी असलेली नाकाबंदी तोडून तो ट्रक नागपूरच्या दिशेने पळाला.
अकोल्यावरून नागपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या शिवसेनेच्या अकोला जिल्ह्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना तो ट्रक दिसला व त्यांनीही त्या ट्रक पाठलाग सुरू केला. अनेक वाहन पाठलाग करत असताना त्या ट्रकने नागपुर जिल्ह्यात प्रवेश करत समृद्धी महामार्ग सोडले.
हिंगणा तालुक्यात एका निर्जन ठिकाणी ट्रक सोडून ट्रकमधील तिघे जण पळून गेले. पोलिसांनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ट्रकला उघडले तेव्हा त्यामध्ये 50 पेक्षा जास्त गाई अत्यंत दाटीवाटीने कोंबून बांधण्यात आल्याचे दिसून आले. अत्यंत दाटीवाटीने बांधल्यामुळे त्यापैकी अनेक गाईंचा मृत्यू झाला होता. तर अनेक गाई गंभीररीत्या जखमी अवस्थेत होत्या. पोलिसांनी अज्ञात गोतस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोधसुरू केला आहे.